भाजपचे राळेभात बिनविरोध ः आता कुठे सुरूवात झालीय, रोहित पवारांवर टीका करीत राम शिंदे अॅक्शनमोडवर
नगर- प्रतिनिधी
जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक जगन्नाथ राळेभात यांच्या घरात दुसऱ्यांदा संचालकपद येत आहे. त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाल्याने भाजप आणि राष्ट्रवादीत राजकीय श्रेयवाद सुरू झाला आहे.
जामखेडमधील जिल्हा बँकेच्या राजकीय घडामोडींबद्दल सोशल मीडियात एक पोस्ट टाकून माजी मंत्री राम शिंदे यांनी मते मांडली आहेत. आमदार रोहित पवार यांनाही त्यांनी धारेवर धरले आहे.
राळेभात हे भाजपचे उमेदवार
या संदर्भात माजी मंत्री शिंदे यांच्या पोष्टमधील आशय असा ः जिल्हा सहकारी बँकेच्या सेवा संस्थेच्या मतदारसंघात भाजपच्या वतीने विद्यमान संचालक जगन्नाथ राळेभात यांना तिकीट दिले होते.
राष्ट्रवादीने सुरेश भोसले यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या उमेदवाराला सूचकच मिळाला नाही.
त्यांनी राजकीय दबाव आणला
राळेभात यांचा मुलगा अमोल राळेभात यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या अर्जावर एकच सूचक होता. ज्यांच्या पक्षाला सूचक मिळाला नाही, त्या पक्षाची अवस्था काय होती, हे यावरून स्पष्ट होते. छाननीत राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्ज बाद झाला असताना आमदार रोहीत पवार यांनी राजकीय दबाव आणून तो मंजूर करून घेतला. त्यामुळे आमच्या उमेदवारावर पडणारा गुलाल काही दिवस लांबला.
हा तर पवारांचा नैतिक पराभव
निवडणूक झाली असती तर त्यांच्या उमेदवाराचा दारूण पराभव झाला असता. या भीतीने आ. रोहीत पवार यांनी आपल्या उमेदवाराचा अर्ज माघे घेतला. हा त्यांचा नैतिक पराभव आहे. त्याची आता सुरवात झाली आहे, अशी पोस्ट राम शिंदे यांनी सोशल मीडियातून शेअर केली आहे.
आता राळेभात यांच्या निवडीचा श्रेयवाद किती रंगतो, हे काळच ठरवील.