पाथर्डी- ब्रह्मांडातील ऊर्जेसाठी मोहटादेवी मंदिराच्या पायात पुरले पावणेदोन किलो सोने, न्यायाधीशांसह तहसीलदारांवर गुन्हा
नगर- प्रतिनिधी
मोहटादेवी मंदीर बांधताना पायात सोने पुरल्याप्रकरणी तत्कालिन अध्यक्ष, विश्वस्त व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याविरुद्ध कट रचून आर्थिक फसवणूक करणे व अमानुष, अनिष्ठ आणि अघोरी, कृत्यांना प्रतिबंध व निर्मूलन व काळी जादू नियम २०१३ कायद्याने गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. अशा प्रकारे गुन्हा दाखल होणारे हे पहिलेच प्रकरण असावे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहा पदाधिका-यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. एक जानेवारी २०१० ते ३१ डिसेंबर २०११ या कालावधीमध्ये मोहटादेवीचे मंदीर बांधताना मंदीराच्या पायामधे अठराशे नव्वद ग्रॅम सोने पुरले.
अंधश्रद्धेतून घातले चोवीस लाख
सुवर्णयंत्रे बनविण्यासाठी मजुरी चोवीस लाख पंच्यांशी हजार रुपये दिली.
हे सर्व अंधश्रद्धेतून केले. मंदीर परीसरात सकारात्मक उर्जा तयार व्हावी, यासाठी हे केल्याचा दावा त्यावेळच्या अध्यक्ष, विश्वस्त व मुख्याधिकारी यांनी केला होता.
याला विरोध करून तत्कालीन विश्वस्त नामदेव गरड यांनी आवाज उठवला होता. ट्रस्टच्या पैशाचा गैरवापर केला म्हणून औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सात मार्च २०१७ रोजी निवेदन करुन न्यायालयाला याबाबत चौकशी करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करून पैसे वसूल करून ते सरकारी तिजोरीत जमा करावेत, अशी मागणी केली होती.
३ फेब्रुवारी २०२१ रोजी औरंगाबादच्या उच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी याबाबत गुन्हे दाखल करुन चौकशी करुन सहा महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य कार्य अध्यक्ष अविनाश पाटील, बाबा आरगडे, अॅड.रंजना गवांदे, प्रकाश गरड, अर्जुन हरेल, प्रमोद भारुळे यांच्या तक्रारीवरुन पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा न्यायाधीशांचाही समावेश
तत्कालीन जिल्हा न्यायाधीश, विश्वस्त व मुख्याधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. यात काही न्यायाधीश, तहसीलदार, वनविभागाचे वरीष्ठ अधिकारी व इतर विश्वस्त यांचा समावेश आहे. तपासात अनेक बाबी समोर येतील, असे ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक व तपासी अधिकारी सूर्दशन
मुंडे यांनी सांगितले.