शिवसंग्राम तालुकाध्यक्ष परमेश्वर टकले यांचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
पाथर्डी प्रतिनिधी
ई- पिक पाहणीची जबाबदारी महसूल विभाग व कृषी विभाग यांच्याकडे देण्याबाबतच्या मागणीचे निवेदन शिवसंग्राम संघटनेच्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाथर्डी चे तहसीलदार शाम वाडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सरकारने यावर्षी ई-पिक पाहणी ॲप सुरू केली आहे .महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या वतीने पिक पाहणी संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत आहे .ई पीक पाहणी करण्यासाठी शासनाने एक परिपत्रक काढले असून, त्यानुसार शेतकऱ्यांनी स्वतःच्या आपल्या पिकाच्या पेराची नोंद करायची आहे .शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करतांना अनेक अडचणी येत आहेत . ई पीक पाहणीचा बोजारा उडवायचा नसेल ,तर शासनाने प्रत्येक गावाची जबाबदारी त्या त्या गावाच्या कृषी सहाय्यक तसेच संबंधित तलाठ्यावर दिली पाहिजे. पिक पेरा नोंद करण्यासाठी शासनाने परिपत्रक काढले आहे.त्यानुसार शेतकऱ्यांनी मोबाईल द्वारे पाणी करायची आहे. ई-पीक पाहणीतून पिक पेरा ची नोंद घेतली जाणार आहे. पिक पेरा येणाऱ्या वर्षा साठी शेतकऱ्यांना महत्त्वाचा असतो, मात्र ई पीक पाहणी करत असतांना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. अनेक अशिक्षित शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाइल नाहीत,तर काहीच्या मोबाईलमध्ये इंटरनेट चालवण्यासाठी बॅलन्स नसतो.तर काही ठिकाणी रेंज नसते. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना आपल्या पिक पेराची नोंद करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यात पिक पेरा नोंदण्याची ३० सप्टेंबर ही शेवटची तारीख असल्याने शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण होत आहे .शासन आणि राज्यकर्त्यांनी या गोष्टीची जाणीव ठेवून ई पीक पाहणी चे सोहळे करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृषी विभाग आणि महसूल विभागावर जबाबदारी टाकून कृषी सहायकांनी आणि संबंधित गावच्या तलाठ्यांनी शेतकऱ्याकडून १००% ई-पीक पाहणी करून घेतली पाहिजे. अशा प्रकारचे जबाबदारी महसूल विभाग आणि कृषी विभागावर किमान काही वर्षा पर्यंत टाकली जात नाही, तोपर्यंत ई पिक पाहणीतून याची नोंद शक्य नाही. पिक पेरा पूर्ण न झाल्यास त्याचे खापर भविष्यात शासन आणि प्रशासन शेतकऱ्यांवर पडणार हे निश्चित आहे. त्यामुळे ई-पिक पाहणी जबाबदारी निश्चित करून कृषी विभाग आणि संबंधित तलाठी यांच्याकडे देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी परमेश्वर टकले, भारत भोईटे, अजय भोसले, परसराम भोईटे, प्रकाश कचरे आदींची उपस्थिती होती.