पाथर्डी- 'या' गावातील तलावाचे नुकसान केल्याने गावकऱ्यांचे आंदोलन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
संबंधित शेतकर्यावर गुन्हा दाखल करून व तलावाची पूर्ववत असणारी स्थिती करावी या मागणीसाठी गावातील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सत्याग्रह आंदोलन केले.
एका शेतकर्याने गाव तलावाची नासधूस करून भिंत व सांडवा तोडल्याची धक्कादायक घटना पाथर्डी तालुक्यातील कासारवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक झाले आहे.
सविस्तर माहिती अशीच, जवखेडे ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या कासारवाडी येथील गाव तलाव सुमारे 35 वर्षांपूर्वी शासनाच्या खर्चातून बांधण्यात आला. दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत.
सध्या हा तलाव जिल्हा परिषद अंतर्गत असून एका शेतकर्याने दोन वर्षांपूर्वी तलावाजवळ जमीन विकत घेतली असून जेसीबीच्या साह्याने तलावाची भिंत सुमारे 200 फूट खोदून नष्ट केली आहे.
ग्रामस्थांनी यापुर्वीच तहसीलदार शाम वाडकर यांना भेटून याबाबत कारवाई करण्यासाठी निवेदन दिले होते. मात्र, प्रशासनाने फक्त पत्रव्यवहार करून हात झटकले.
सरकारी मालमत्ता असताना आडमुठी भूमिका घेणारा एका शेतकर्याने सरकारी तलावाचे मोठे नुकसान करून संपूर्ण परिसराला वेठीस धरले आहे.
गैरप्रकार होत असताना देखील प्रशासन गप्प राहत असल्याने ग्रामस्थ मोठे संतापले आहे. यामुळे भविष्यात मोठ्या आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.