महाराष्ट्र
2553
10
सुसंवाद निर्माण करण्याचे काम साहित्य करते - डॉ. कैलास दौंड
By Admin
सुसंवाद निर्माण करण्याचे काम साहित्य करते - डॉ. कैलास दौंड
पाथर्डी- प्रतिनिधी
साहित्य व कलाक्षेत्रातील प्रतिभा ही परमेश्वराने सर्वांनाच दिली आहे, पण त्याचा योग्य सदुपयोग फारच थोडे करतात. भाषेतून व्यक्त होण्याचे सामर्थ्य कवी व विचारवंतांमध्ये असते.
जेव्हा माणूस एखादे पुस्तक वाचतो, तेव्हा तो पुस्तकाच्या व्यक्तिरेखांमध्ये स्वतःला पाहतो. राजकारणी व साहित्यिकांची दरी वाढत चालल्यामुळे समाज बिघडत चालला आहे. अहंकारास कलेच्या क्षेत्रात शून्य किंमत असून ज्यावेळी सुसंवाद निर्माण होईल, त्यावेळी राष्ट्र पुढे जाईल. साहित्यातूनच संवाद निर्माण होतो, म्हणूनच विसंवादी जगामध्ये सुसंवाद निर्माण करण्याचे काम साहित्य करते, असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक डॉ. कैलास दौंड यांनी केले.
ते बाबूजी आव्हाड महाविद्यालयात थोर स्वातंत्र्यसेनानी, मा. आ. स्व. बाबूजी आव्हाड यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित साहित्यप्रेमी बाबूजी आव्हाड साहित्य जागर कार्यक्रमात बोलत होते.
पाथर्डी तालुक्यातील साहित्यिक व कवींना तसेच नवकवींना आपले विचार व्यक्त करण्यासाठी आयोजिलेल्या या साहित्य जागराच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शाखा अध्यक्ष अविनाश मंत्री तर व्यासपीठावर पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष सुरेशराव आव्हाड, विश्वजीत गुगळे, रामकिसन शिरसाठ, विश्वस्त सुनिल साखरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे उपस्थित होते.
डॉ. दौंड पुढे म्हणाले, पाथर्डी तालुक्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व साहित्यिक क्षेत्रात माजी आमदार स्व. बाबूजी आव्हाड यांचे मोलाचे योगदान आहे. पाथर्डी तालुक्यातील साहित्यिक ऊसतोडणी कामगारांवर साहित्य लिहितात, पण बाबूजींनी त्यांची परिस्थिती बदलण्याचे महान कार्य केले. ऊसतोडणी कामगारांच्या परिस्थितीत सुधारणा करायची असेल तर त्यांना अनुदान, मदत न देता त्यांच्या मुलांना शिक्षण दिले पाहिजे. त्यांच्या मेंदूचा विकास केला पाहिजे, तरच त्यांच्या हातातून कोयता जाईल. म्हणूनच त्यांनी या गोरगरीब जनतेसाठी पार्थ विद्या प्रसारक मंडळाची स्थापना केली.
पाथर्डी तालुक्यात शिक्षणाची गंगा आणणारे भगीरथ म्हणजे बाबूजी होत. बाबूजींचा त्याग नव्या पिढीला कळण्यासाठी नवसाहित्यिकांनी लिहितं व्हावं, असे ते शेवटी म्हणाले.
या साहित्य जागर कार्यक्रमात तालुक्यातील साहित्यकांनी व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपले विचार व कविता सादर केल्या. यावेळी संजय मेहरकर व रमेश मोरगावकर यांचा त्यांच्या उस्फुर्त लिखाणाबद्दल सन्मान करण्यात आला. अजय रक्ताटे यांच्याकडून सर्व कवींना काव्यसंग्रह भेट देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, सूत्रसंचालन डॉ. बबन चौरे, डॉ. अशोक कानडे, डॉ. अभिमन्यू ढोरमारे तर आभार डॉ. सुभाष शेकडे यांनी मानले.
साहित्यिक अनंत कराड, संदीप काळे, लक्ष्मण खेडकर, अर्जुन देशमुख, वसंत होळकर, ज्योती आधाट, हुमायून आतार, निवृत्ती शेळके, बाळासाहेब चिंतामणी, चंद्रकांत उदागे, बबन शेवाळे, डॉ. राजकुमार घुले, शरद मेढे, प्राचार्य अशोक दौंड, संतोष दहिफळे, राजेंद्र सावंत, बाबासाहेब गर्जे, महेंद्र शिरसाठ आदी उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात स्व. बाबूजी आव्हाड जन्मशताब्दी व ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
Tags :

