खासदार सुजय विखेंना आमदार रोहीत पवारांनी दिले हे उत्तर
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी व नगरसेवक यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेल्या प्रवेशामुळे पुन्हा एकदा विखे व पवार या दोन कुटुंबातील राजकीय संघर्षाला सुरुवात झाल्याचे चित्र कर्जत व जामखेड तालुक्यामध्ये दिसून येत आहे. या प्रवेशाच्या माध्यमातून भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी नगर जिल्ह्याचे राजकारण पवारांना कळणार नाही, असे वक्तव्य चापडगाव येथे बोलताना केले. तर, कधीतरी लोकांमध्ये येऊन काहीतरी वक्तव्य करायची, मात्र त्याला आम्ही फारसे महत्त्व देत नाही, असे जोरदार प्रत्युत्तर आमदार रोहित पवार यांनी विखे यांना दिले आहे.
चापडगाव येथे बोलताना खासदार विखे यांनी पवार कुटुंबियांवर टीका करताना नगर जिल्ह्याचे राजकारण यांना समजणार नाही, असे वक्तव्य केले होते. कर्जत-जामखेड तालुक्यातील नेतृत्व बदल झाल्यानंतर मतदार संघाचा विकास थांबला आहे. आज ज्या कामाची उद्घाटन आणि भूमिपूजन होत आहेत, ते सर्व माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या काळामध्ये मंजूर झालेली कामे आहेत, असेही विखे म्हणाले होते.
दरम्यान, विखे यांच्या वक्तव्याला रोहित पवार यांनी देखील तितक्याच सडेतोडपणे उत्तर दिले. ते म्हणाले, ‘हे त्यांचे वैयक्तिक राजकीय वक्तव्य आहे. यामुळे त्याकडे किती लक्ष द्यावयाचे हे आम्ही ठरवले आहे. निवडणुकीमध्ये कोण विजय होणार, हे जनता ठरवत असते आणि जनतेच्या मनामध्ये काय आहे, याची आम्हाला पुरेपूर माहिती आहे. उलट कधीतरी लोकांमध्ये यावयाचे त्यांना लोकांच्या मनात काय आहे, हे समजत नाही. कोठे तरी ठराविक ठिकाण येऊन कोणी तरी बोलत असेल, तर त्याला किती महत्त्व द्यायचे, हे आम्हाला माहित आहे.’