महाराष्ट्र
17131
10
बुद्धिबळासारख्या खेळातून विचारशक्ती, संयम आणि नेतृत्वगुण विकसित होतात
By Admin
बुद्धिबळासारख्या खेळातून विचारशक्ती, संयम आणि नेतृत्वगुण विकसित होतात : राहुल राजळे
पाथर्डी - तालुका
आमदार मोनिकाताई राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे यशस्वी आयोजन
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक प्रगती पुरेशी नसून विद्यार्थ्यांमध्ये विश्लेषणात्मक आणि धोरणात्मक विचारसरणी विकसित होणे आवश्यक आहे. बुद्धिबळ हा असा खेळ आहे जो तरुणांना संयम, एकाग्रता आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची सवय लावतो, असे मत श्री दादापाटील राजळे शिक्षण संस्थेचे विश्वस्त,मा.राहुल राजळे यांनी व्यक्त केले. दादापाटील राजळे कला व विज्ञान महाविद्यालयात गुरुवार दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त तसेच आमदार मोनिकाताई राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, बुद्धिबळ खेळताना खेळाडूला पुढील अनेक चालांचा अंदाज घेऊन योजना आखावी लागते. हीच सवय जीवनातील आव्हानांना सामोरे जाताना उपयोगी ठरते. त्यामुळे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या खेळाकडे केवळ छंद म्हणून नव्हे तर व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी साधन म्हणून पाहावे.
दादापाटील राजळे कला व विज्ञान महाविद्यालय येथे दरवर्षी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले जाते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक क्रीडाप्रती सातत्याने उत्साह वाढताना दिसत आहे. या वर्षीच्या स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल १०३ स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. विजयी तसेच गुणवंत स्पर्धकांना मान्यवरांच्या शुभहस्ते रोख रकमेच्या स्वरूपात पारितोषिके प्रदान करण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे विश्वस्त मा.श्री. सुभाषराव ताठे होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ शैक्षणिक उपक्रम नव्हे तर बौद्धिक, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांचीही तितकीच आवश्यकता असल्याचे सांगितले. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त, स्पर्धात्मक वृत्ती आणि नेतृत्वगुण विकसित होतात, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वतःची क्षमता सिद्ध करण्यासाठी व्यापक व्यासपीठ उपलब्ध होते, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमासाठी पाथर्डी तालुक्याचे तहसीलदार श्री. उद्धव नाईक व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सारिकाताई नाईक यांची पालक म्हणून विशेष उपस्थिती लाभली. यावेळी बोलताना श्री. नाईक यांनी बुद्धिबळासारख्या बौद्धिक खेळांचे विद्यार्थ्यांच्या मानसिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगितले. बुद्धिबळामुळे खेळाडूंमध्ये शिस्त, वेळेचे नियोजन आणि नियमांचे पालन करण्याची सवय विकसित होते. तसेच कठीण प्रसंगात घाईगडबड न करता शांतपणे विचार करून निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते, असे त्यांनी नमूद केले. जीवनात यशस्वी होण्यासाठी संयम, सातत्य आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची कला अत्यावश्यक आहे; बुद्धिबळ हा खेळ हे गुण प्रभावीपणे जोपासतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
पारितोषिक वितरण समारंभास शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री. साहेबराव सातपुते, श्री. बाळासाहेब गोल्हार, आदिनाथ कृषी विकास प्रतिष्ठानचे सचिव श्री. भास्करराव गोरे व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव श्री. यशवंत बापट व त्यांच्या सहकाऱ्यानी परीक्षक म्हणून भूमिका पार पाडली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन अधीक्षक श्री. विक्रम राजळे व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. रोहित आदलिंग यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किशोर गायकवाड यांनी केले तर आभार प्रा. उमेश तिजोरे यांनी मानले.
Tags :
17131
10




