महाराष्ट्र
38289
10
कृषीथॉन २०२५ चे दिमाखदार उद्घाटन; शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन व
By Admin
कृषीथॉन २०२५ चे दिमाखदार उद्घाटन; शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन व लाईव्ह डेमो' विशेष उपक्रम
नगर सिटीझन live 24 न्यूज नेटवर्क-
नाशिकची ओळख बनलेले भारतातील अग्रगण्य कृषी प्रदर्शन 'कृषीथॉन २०२५' चे गुरूवारी (दि.१३) दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन झाले. या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य असलेले 'लाईव्ह डेमो' या विशेष उपक्रमात पीक प्रात्यक्षिक मळा लक्षवेधी ठरला.
त्यातील ४० हून अधिक पिके आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पिकवलेली आहेत. ते पाहण्यासाठी शेतकरीवर्ग, कृषी विद्यार्थी व संशोधकांनी भेटी दिल्या. तसेच प्रदर्शनातात शेती सुलभ व प्रगत करणारे तंत्रज्ञान व अवजारांचे ३०० हून अधिक स्टॉल आहेत.
हे प्रदर्शन आजपासून (दि.१३) ते १७ नोव्हेंबरदरम्यान ठक्कर डोम, ए.बी.बी. सर्कलजवळ सुरू झाले आहे. सकाळी ११ वाजता उद्घाटन सोहळा झाला. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्कर भगरे, आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी रवींद्र माने, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, नाडाचे अध्यक्ष अरूण मुळाणे, चंद्रकांत ठक्कर, उद्योजक लोकेश शेवडे, तसेच आयोजक संजय न्याहारकर, सहआयोजक साहील न्याहारकर, अश्विनी न्याहारकर, नितीन मराठे हे उपस्थित होते.
याप्रसंगी कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटेयांना उल्लेखनीय सहकार कार्यासाठी'सहकार महर्षीʼ म्हणून सन्मानित करण्यात आले. यानिमित्ताने सहकार क्षेत्रात नवनवीन उभारी देणाऱ्या आणि शेतकऱ्यांसाठी नवे मार्ग खुले करणाऱ्या नेत्याचा गौरव करण्याचा हेतू आहे. त्याचाच एक भाग म्हणून श्रीराम शेटे यांच्या कार्याचा विशेष सन्मान करण्यात आला.
खासदार भगरे म्हणाले की, कृषी तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक कृषीथॉनमध्ये घडते. एआय तंत्रज्ञानाचा वापर द्राक्ष शेतीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. द्राक्ष शेतीतील विमा हा सरकारी कंपन्यांकडून काढण्यासाठीचा विषय आपण अधिवेशनात मांडू पारंपारिक शेती करताना नव्याचा ध्यास कसा घ्यावा, याचे मार्गदर्शन कृषीथॉनमधून घडत आहे. कृषीथॉन ही नाशिकची ओळख बनली आहे. कृषी उत्पादन खर्च कसा कमी होईल व नवीन अवजारांची माहिती या प्रदर्शनातून घडते.
साहिल न्याहारकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, यंदाच्या प्रदर्शनात बदलत्या हवामानावरील थीम विविध कार्यक्रमातून ठेवली आहे.
या वर्षी कृषीथॉनमध्ये प्रथमच आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त पीक मळा हे 'लाईव्ह डेमो' आकर्षण आहे. ज्यात शेतकऱ्यांना ४० हून अधिक भाजीपाल्यांच्या वाणांचे थेट रोपण, कीड व रोग व्यवस्थापन, तसेच मशागत तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहता येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीतील प्रत्यक्ष अनुभवावर आधारित मार्गदर्शन मिळणार आहे.
दरवर्षीप्रमाणेच कृषीथॉन २०२५ मध्ये देखील देशासह परदेशातील ३०० हून अधिक नामांकित कृषी कंपन्या आणि संस्था सहभागी आहेत. यामध्ये कृषी निविष्ठा उत्पादक, बियाणे कंपन्या, कृषी अवजारे उत्पादक, ट्रॅक्टर व सिंचन कंपन्या, फवारणी यंत्रे उत्पादक, बँका, विमा कंपन्या, कृषी संशोधन केंद्रे, रोपवाटिका, अन्नप्रक्रिया उद्योग आणि विविध शासकीय विभागांचा सहभाग आहे.
Tags :
38289
10




