महाराष्ट्र
नगर-पुणे इंटरसिटी लाईनचे काम सुरु करा
By Admin
नगर-पुणे इंटरसिटी लाईनचे काम सुरु करा
खा. नीलेश लंके यांची संसदेत मागणी; संभाजीनगर-पुणे, कल्याण रेल्वेमार्गाचीही मागणी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पारनेर : नगर-पुणे इंटरसिटी रेल्वेमार्गाच्या लाईनचे काम केवळ मेंटेनन्स पॉईंट उपलब्ध नसल्याने अनेक दिवसांपासून प्रलंबित असून, हे काम लवकरात लवकर सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी खा. नीलेश लंके यांनी बुधवारी संसदेत केली.
सभागृहाचे लक्ष वेधताना खा. लंके यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, छत्रपती संभाजीनगर ते नगर व नगर ते पुणे रेल्वेमार्ग अनेक महत्वाच्या शहरांशी सबंधित आहे. या मार्गावर श्रीक्षेत्र देवगड,
श्रीक्षेत्र शनि शिंगणापूर, श्रीक्षेत्र शिर्डी आणि गणपती रांजणगांव, ही महत्वपूर्ण धार्मिक स्थळे आहेत. या धार्मिकस्थळांना भेटी देण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या मार्गावर वाळुंज, सुपा, गणपती रांजणगाव, पुणे ही औद्योगिक क्षेत्रे आहेत. तिथे काम करणारे अनेक मजूर, कामगार, व्यापारी यांनाही प्रवास करावा लागतो. हा रेल्वे मार्ग झाल्यास अनेक प्रवाशांचा प्रवास सुलभ होईल तसेच औद्योगिक क्षेत्रातील उत्पादित मालाच्या वाहतुकीसाठीही सुविधा उपलब्ध होईल. या मार्गावर पुणे,
संभाजीनगर व शिर्डी ही विमानतळे असल्याने हा मार्ग महत्वपूर्ण आहे. तसेच नगर-कल्याण रेल्वेमार्गाचे काम सुरू होणेही महत्वाचे आहे. बीड, नगरचे लोक पुणे, मुंबई,
कल्याणशी निगडीत आहेत. त्यासाठी हा मार्ग सुरू करून प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी खा. लंके यांनी केली.
निंबळकला उड्डाणपूल हवा
माझ्या मतदारसंघातील निंबळक हे गाव नगर शहराशी निगडीत आहे. या गावाजवळील रेल्वेमार्गावर उड्डाणपुलाची आवश्यकता आहे. कारण २५ ते ३० गावांचा रोजचा संपर्क या मार्गावरून आहे. दर १५ मिनिटांनी रेल्वे क्रॉसिंगसाठी हा मार्ग बंद असतो. नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी या उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे.
ज्येष्ठ नागरिकांना प्रवास शुल्कात सवलत द्या
अनेक वर्षे रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना प्रवास शुल्कात सवलत देण्यात येत होती. कोरोना काळात ही सवलत बंद करण्यात आलेली आहे. साठ वर्षे पुरुषांसाठी तर ५८ वर्षांवरील महिलांसाठी ४० ते ५० टक्के सवलत देण्यात येत होती. ही सवलत लवकर सुरू करून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्यात यावा.
Tags :
56991
10