शब्दगंध साहित्यिक परिषदेची कार्यशाळा संपन्न
By Admin
शब्दगंध साहित्यिक परिषदेची कार्यशाळा संपन्न
अहिल्यानगर प्रतिनिधी:
शब्दगंध साहित्यिक परिषदेचा विस्तार राज्य पातळीवर व्हावा,यासाठी वाचक आणि साहित्यिक चळवळ वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न व्हावा, असे मत शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी व्यक्त केले.
लोणावळा येथे शब्दगंध साहित्यिक परिषदेचे चर्चासत्र आणि कार्यशाळा इम्प्रेशन व्हॅली येथे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली,त्यावेळी ते बोलत होते.
संस्थापक सचिव सुनील गोसावी, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, राज्य संघटक प्रा. डॉ. अशोक कानडे, कार्यवाह शाहीर भारत गाडेकर, सहकार्यवाह डॉ. तुकाराम गोंदकर, सहसचिव प्रा. डॉ.अनिल गर्जे, संपादक मकरंद घोडके, राजेंद्र चोभें,देविदास अंगरख, काकासाहेब भाबड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
निसर्गरम्य वातावरणात झालेल्या या कार्यशाळेत उपस्थित सर्व मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली. शब्दगंधला विविध उपक्रमातून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे, लोकाश्रया बरोबरच राजाश्रय देखील प्राप्त होतं आहे. आता ही चळवळ खऱ्या अर्थाने राज्यभर व्हावी यासाठी विशेष संघटनात्मक प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी व्यक्त केली. यासाठी जिल्हानिहाय बैठकांचे आयोजन करण्यात येणार असुन संघटनात्मक पातळीवर नवोदित साहित्यिकांचे एकत्रीकरण करून चळवळीतील साहित्यिकांना या प्रवाहात सामील करून घेण्यात येणार आहे. बैठकांनंतर काव्य संमेलन, कथाकथन,परिसंवाद, चर्चासत्र, पुस्तक प्रकाशन विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
नवोदित लेखक,कवींनी शब्दगंध चे सभासदत्व स्वीकारावे, यासाठी व्हाट्सअप क्रमांक ९९२१००९७५० वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
साहित्य क्षेत्रात वावरताना शब्दगंध मुळे आपल्याला कशी वेगळी ओळख मिळाली, समाजात आपल्या चळवळीच्या कामाचे कौतुक झाले, याबाबतचे अनुभव कथन सर्वांनी केले. यातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्याची उभारी मिळाली.
या कार्यशाळेत पुणे, नाशिक, अहिल्यानगर,मुंबई, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर येथील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शब्दगंध ची चळवळ डिजिटल प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणारे मेट्रो न्यूज चे संपादक मकरंद घोडके यांचा यावेळी अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक कार्यवाह भारत गाडेकर यांनी केले तर प्रा. डॉ.अशोक कानडे यांनी सूत्रसंचालन केले. शेवटी राजेंद्र चोभे यांनी आभार मानले.

