मालमत्ता धारकांनी भूमी अभिलेख उतारे सादर करावेत- मुख्याधिकारी संतोष लांडगे
पाथर्डी प्रतिनिधी:
शहरातील मालमत्ता धारकांनी भूमी अभिलेख विभागातील अद्ययावत उतारे सादर करावेत.इतर कुठल्याही विभागातील कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार नाहीत, असा इशारा शहरातील अतिक्रमण धारकांना नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी दिला.
मागील १५ दिवसापूर्वी शहराद्यतील अतिक्रमण काढण्याचा पहिला टप्पा संपन्न झाला.दुसरा टप्पा गुरुवार पासून सुरु होणार आहे.यासंदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी कर्मचाऱ्यासह शहरातील अजंठा चौक,मेन रोड,क्रांती चौक,नवी पेठ,आंबेडकर चौक,नाईक चौक, आदी भागात पाहणी करून रस्त्याची हद्द निश्चित करून अतिक्रमणधारकांना आपले अतिक्रमण स्वतःहून काढण्याच्या सूचना दिल्या.यावेळी पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे,अतिक्रमण विभाग प्रमुख विशाल मडवई,नगर अभियंता नरेंद्र तेलोरे,दत्तात्रय ढवळे,पंकज पगारे,लक्ष्मण हाडके आदी होते.
मागील काही वर्षात शहरातील अतिक्रमण वाढले आहे.यामुळे प्रमुख मार्गासह व्यापार पेठेत जाणा-या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत होती.याबाबत अनेक नागरिकांनी पालिका,पोलीस प्रशासन,राज्य व राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे तक्रारी केल्या होत्या.याची दखल घेऊन प्रशासनाने अतिक्रमण धारका विरोधात एकत्रित पणे जोरदार मोहीम चालू केली आहे.गुरुवारपर्यंत अतिक्रमण स्वतःहून न काढल्यास नगरपालिका अतिक्रमणधारकावर कारवाई करणार आहे.दरम्यान नवी पेठेतील एका धार्मिक स्थळाचे वाढीव बांधकाम अधिकृत आहे की नाही, याची पालिकेने माहिती द्यावी,अशी मागणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून होत आहे.तसेच सण व उत्सवाच्या काळामध्ये अजंठा चौक,नाईक चौक,मेन रोड आदी मुख्य रस्त्यावर पथारी मांडून बसणाऱ्या विक्रेत्यावर अशाच प्रकारे धडक कारवाई करण्याची देखील मागणी वाहनधारक व नागरिकातून होत आहे.