१ मे पासून कोविन पोर्टल, आरोग्य सेतू अॅपवर नोंदणी केल्यानंतरच मिळणार लस
By Admin
१ मे पासून कोविड पोर्टल, आरोग्य सेतू अॅपवर नोंदणी केल्यानंतरच मिळणार लस
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 25 एप्रिल 2021
देशभरात १ मे पासून तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरण मोहिम सुरु होत आहे. या टप्प्यात १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून यासंबंधींच्या नियमांची माहिती दिली. तसेच पद्धतशीरपणे हा लसीकरण कार्यक्रम राबवण्याचे आदेश दिले आहेत. या पत्रात सरकारनं म्हटलंय की, कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतू अॅपवर ऑनलाइन नोंदणी करुन अपॉईंटमेंट घेतल्यावरच ही लस दिली जाणार आहे. लसीकरण केंद्रांवर जाऊन ऑफलाइन नोंदणीद्वारे ही लस घेता येणार नाही. मात्र, यातून ४५ वर्षांवरील नागरिकांना सूट देण्यात आली आहे.
एका आरोग्य अधिकाऱ्यानं सांगितलं की, सर्वांना लस मिळायला सुरुवात झाल्यानंतर डोसच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. गर्दीला नियंत्रित करण्याच्या उद्देशानं १८ ते ४५ वर्षांच्या लोकांसाठी कोविन अॅपवर नोंदणी करणे आणि लशीसाठी अपॉईंटमेंट घेणं अनिवार्य करण्यात आलं आहे. सुरुवातीला लस केंद्रावर नोंदणी करण्यास यासाठी मज्जाव करण्यात आला आहे कारण कोणताही गोंधळ होऊ नये.
२८ एप्रिलपासून सुरु होणार नोंदणी
या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी २८ एप्रिलपासून कोविन पोर्टल आणि आरोग्य सेतू अॅपवर नोंदणीची प्रक्रिया सुरु होईल. यावेळी देखील लसीकरण प्रक्रिया आणि लस घेताना द्यावे लागणारी कागदपत्र यापूर्वी होती तीच असतील.
खासगी रुग्णालयांना लस उत्पादक कंपन्यांकडून घ्यावी लागणार लस
सध्या खासगी रुग्णालये केंद्र सरकारकडून लस विकत घेऊन ती २५० रुपयांना देत आहेत. मात्र, १ मे पासून ही व्यवस्था संपुष्टात येईल यावेळी खासगी रुग्णालयांना थेट लस उत्पादक कंपनीकडूनच ही लस विकत घ्यावी लागणार आहे. तसेच या कंपन्यांनी निश्चित केलेल्या किंमतीत ती उपलब्ध करुन द्यावी लागेल. दरम्यान, सरकारी लस केंद्रांमध्ये आरोग्य कर्मचारी, कोविड योद्धे आणि ४५ वर्षांवरील नागरिकांना केंद्र सरकारच्यावतीनं निशुल्क लस मिळत राहणार आहे.