महाराष्ट्र
41414
10
सोनोशी शाळेची खो-खो स्पर्धेत ऐतिहासिक यशाची नोंद
By Admin
सोनोशी शाळेची खो-खो स्पर्धेत ऐतिहासिक यशाची नोंद
मैदान नसतानाही जिल्हा अजिंक्य केला!
जिद्दीच्या बळावर इतिहास घडवणारी सोनोशी शाळा
पाथर्डी प्रतिनिधी:
इतिहास घडवण्यासाठी मोठी मैदाने, आलिशान सुविधा किंवा वर्षानुवर्षांचा सरावच लागतो असे नाही;तर जिद्द, नियोजन, मेहनत आणि विद्यार्थ्यांवरील विश्वास असला की अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात, हे पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनोशी यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या अहिल्यानगर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा त्रिमूर्ती पब्लिक स्कूल नेवासा फाटा च्या भव्य मैदानात संपन्न झाल्या.या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा जिल्ह्यातील सर्व चौदा तालुक्यांनी सहभाग नोंदविला त्या स्पर्धेत पाथर्डी तालुक्यातील स्वतःचे मैदान नसलेल्या या ग्रामीण शाळेने जिल्हाभरातील मातब्बर संघांना मागे टाकत ऐतिहासिक यशाची नोंद केली आहे. आज संपूर्ण जिल्ह्यात शिक्षण, क्रीडा आणि प्रशासन क्षेत्रात “सोनोशी शाळा” हे नाव अभिमानाने घेतले जात आहे.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सोनोशी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले— लहान गट मुली खो-खो – जिल्हा अजिंक्यपद, मोठा गट मुली खो-खो – जिल्हा अजिंक्यपद, लहान गट मुले खो-खो – जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक,लांब उडी (वैयक्तिक) – जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक
एकाच वर्षात चार पारितोषिके पटकावत सोनोशी शाळेने पाथर्डी तालुक्याच्या क्रीडा इतिहासात सुवर्णअक्षरांनी आपले नाव कोरले आहे.
*परंपरागत बलाढ्य तालुक्यांना जोरदार धक्का*
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये अकोले, कर्जत, पारनेर, कोपरगाव यांसारख्या तालुक्यांचे वर्चस्व अनेक वर्षांपासून अबाधित राहिले आहे.भरपूर मैदाने, नैसर्गिक सुविधा, प्रशिक्षक आणि वर्षभर चालणारा सराव यामुळे हे तालुके इतरांसाठी मोठे आव्हान ठरत असत.पाथर्डी,शेवगावसारखे तालुके अनेकदा केवळ “सराव सामने खेळणारे संघ” म्हणून पाहिले जात होते.मात्र यावर्षी सोनोशी शाळेने पहिल्याच दिवसापासून ठाम भूमिका घेतली.आणि ही भूमिका त्यांनी केवळ शब्दांत नव्हे, तर मैदानावरील प्रत्येक सामन्यात कृतीतून सिद्ध केली. दोनही दिवस जिल्हास्तरीय मैदानावर फक्त आणि फक्त पाथर्डी तालुक्याची चर्चा रंगलेली होती.
या यशाचे सर्वात मोठे आणि प्रेरणादायी वैशिष्ट्य म्हणजे—
सोनोशी शाळेकडे स्वतःचे मैदान नाही.शाळेला मोकळी जागा नसतानाही शाळेच्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या जागेचा योग्य वापर करून, वेळेचे काटेकोर नियोजन करत, शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सराव करून घेतला.
फक्त ३ ते ४ महिन्यांच्या नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण सरावातून हे उत्तुंग यश मिळवले.शिक्षकांची अथक मेहनत – यशाची खरी गुरुकिल्लीया ऐतिहासिक यशामागे शाळेतील शिक्षकांची मेहनत, नियोजन आणि विद्यार्थ्यांवरील नितांत विश्वास ठामपणे उभा आहे.
या कामगिरीत मोलाचा वाटा उचलणारे-मुख्याध्यापक देविदास बडे , पदवीधर शिक्षक अमोल भंडारी,बाबासाहेब खेडकर,नारायण दहिफळे,
दत्तू नाना दहिफळे आणि उपक्रमशील शिक्षक अण्णासाहेब साळुंके
या सर्वांनी जीव ओतून वेळेची पर्वा न करता, विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले.
वैयक्तिक खेळातही सोनोशीचा ठसा-सामूहिक खेळांसोबतच वैयक्तिक क्रीडा प्रकारातही सोनोशी शाळेने आपली गुणवत्ता सिद्ध केली.
सोहम जालिंदर दौंड (इयत्ता ५ वी) या विद्यार्थ्याने लांब उडी प्रकारात जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक मिळवत शाळेच्या यशात आणखी एक मानाचा तुरा खोवला.
“सोनोशी शाळेचा खेळ अत्यंत उच्च दर्जाचा होता.जिल्हापरिषदेकडून राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उपक्रमांनाया विद्यार्थ्यांनीपूर्ण न्याय दिला आहे.”
-शिक्षणाधिकारी भास्कर पाटील
“ही तालुक्यासाठी ऐतिहासिक बाब आहे.आजवर जे शक्य वाटत नव्हते, ते सोनोशी शाळेने करून दाखवले आणि पाथर्डी तालुक्याची मान उंचावली.”
-----गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड
“ही शाळा प्रत्येक उपक्रमात नेहमीच अग्रेसर असते. शिक्षक कष्टाळू जिद्दी आणि सकारात्मक आहेत या यशाने संपूर्ण तालुका प्रशासनाचा अभिमान आहे".
---विस्तार अधिकारी रामनाथ कराड.
गावकऱ्यांचा विश्वास – यशाचा मजबूत पाया
या यशामागे केवळ शिक्षक आणि विद्यार्थीच नव्हे, तर
शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, ब्रम्हनाथ यात्रा कमिटी सोनोशी सेवा विकास सोसायटी सोनोशी, माता-भगिनी आणि संपूर्ण ग्रामस्थांचे सहकार्य मोलाचे ठरले आहे.
प्रेरणादायी संदेश
मैदान नसतानाही जिल्हा अजिंक्यपद मिळवणारी सोनोशी शाळा आज प्रत्येक शिक्षकाला, प्रत्येक ग्रामीण शाळेला एकच संदेश देते—“सुविधा नसल्या तरी संधी निर्माण करता येते.
जिद्द असेल, तर इतिहास घडतो!”
Tags :
41414
10




