बिबट्याचा हल्ला, दोन जण गंभीर जखमी व बिबट्याचा मृत्यू
By Admin
बिबट्याचा शेतक-यावर हल्ला, दोन जण गंभीर जखमी व बिबट्याचा मृत्यू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 19 मे,2021 बुधवार
पारनेर तालुक्यातील कळस येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, हल्ला केल्यानंतर काही तासांनी बिबट्याचा मृत्यू झाला आहे. मृत बिबट्याचा पंचनामा करुन शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकारामुळे मात्र परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
कळस गावातील मेंढे मळ्यातील पोपट येवले (वय ७२) व सुदर्शन घाडगे (वय ३०) या शेतकऱ्यावर काल, मंगळवारी बिबट्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. दोघेही ही संध्याकाळी सातच्या सुमारास शेतातील कामे आटपून घरी जात असताना हा हल्ला झाला. यावेळी सोबत असणाऱ्या महिलांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने पळ काढला, त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही जखमींना आळेफाटा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या हल्ल्यात पोपट येवले या वृद्धांच्या मानेवर गंभीर जखमा आहेत, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. तर सुदर्शन येवले यांच्या हातावर व इतर ठिकाणी जखमा असून त्याची प्रकृती स्थिर आहे. तर रात्रीच्या सुमारास हल्ला केलेल्या बिबट्याचा मृत्यू झाला. आज, बुधवारी सकाळी शेतकऱ्यांना बिबट्या शेतात निपचित पडला असल्याचे दिसले. त्यांनी याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवल. पथकाने पाहणी केल्यानंतर बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. बिबट्या काही दिवसापासुन उपाशी असल्याने भुकेने व्याकूळ झाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. वनविभागाचे अधिकारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पंचनामा करून तपास सुरू आहे. तसेच बिबट्याचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. यावेळी सहाय्यक वनसंरक्ष एस.एस.पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी सीमा गोरे, वनपाल नाना जाधव, संदीप भोसले, एस.एस.जाधव, छबु रोडे, वनरक्षक हरी आठरे, उमेश खराडे, गजानन वाघमारे उपस्थित होते.

