प्रियंका गांधीना अटक केल्याबद्दल उत्तर प्रदेश राज्य सरकारच्या निषेध
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेचे नगर शहरात पडसाद उमटले असून, शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधी यांना समर्थन देत उत्तर प्रदेश राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
वाडिया पार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन पक्ष कार्यकर्त्यांनी हातात तिरंगा झेंडा मिरवत घोषणा देत तासभर आंदोलन सुरु ठेवले होते. यात पक्षाचे जिल्हा सरचिटणीस उबेद शेख, प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज खान, महिला काँग्रेसच्या किरण आळकुटे, शहर उपाध्यक्ष शशिकांत पवार, आर.आर.पाटील, अनिल परदेशी, संतोष धीवर, अॅड.नरेंद्र भिंगारदिवे, अभिजित कांबळे, मार्गारेट जाधव आदि या आंदोलनात सहभागी झाले होते.
लखीमपूरच्या शेतकर्यांना भेटायला निघालेल्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आले आहेत. या घटनेने संतप्त कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारचा निषेध करत संताप व्यक्त केला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ठिकठिकाणी, असे आंदोलन करण्यात आले असून, त्यात नगर आघाडीवर होते.