तिसगाव- महामार्ग गेला पाण्यात , वयोवृद्ध व्यक्ती काढतात पाण्यातून वाट
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
मागील आठ दिवसापासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे तिसगाव येथे महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यातच महामार्गाच्या दुतर्फा बाजूने असलेल्या दुकानदारांनी दुकानाच्या तळघरात साचत असलेले पाणी इलेक्ट्रिक मोटरद्वारे थेट महामार्गावर पद्धतशीरपणे सोडून दिल्याने महामार्ग अक्षरशा पाण्यात गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
तिसगाव येथील वृद्धेश्वरचौक ते बाजारतळापर्यंत महामार्गावर दुतर्फा बाजूने मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. या पाण्यामुळे पादचार्यांना रस्त्याच्या कडेने वाट काढताना मोठी कसरत करावी लागते. अनेक वयोवृद्ध व्यक्ती पाण्यातून वाट काढताना पाण्यातील खड्याचा अंदाज न येत नसल्याने पाण्यात पडत आहेत. तसेच महामार्गाच्या दुतर्फा बाजूने असलेल्या व्यापाऱ्यांच्या दुकानात देखील खालच्या तळ घरात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने त्यांनी देखील मोटारीद्वारे पाणी महामार्गावर सोडले आहे. त्यामुळे महामार्गावर पाणीच पाणी, अशी अवस्था झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी पादचाऱ्यांना पायी चालण्यासाठी फुटपाथचे बांधकाम केले. मात्र काही दुकानदाराने या फुटपाथवर अतिक्रमण केल्याने फुटपाथ आता दिसेनासे झाली आहेत.