महाराष्ट्र
659
10
पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात, ‘वळसे की तनपुरे’?
By Admin
पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात, ‘वळसे की तनपुरे’? राजकीय जाणकारांचे व प्रशासनाचे निवडीकडे लागले लक्ष..
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नुकतेच पालकमंत्रिपद सोडणार असल्याचे विधान केले आहे. यामुळे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची माळ राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे की राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या गळ्यात जाते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले. मात्र, जिल्ह्याचे राजकारण लक्षात घेता तनपुरे हे नवखे असल्याने व जिल्ह्यातील मातब्बर राजकारणी लक्षात घेता यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अत्यंत प्रभावी काम केलेल्या वळसे यांच्याकडे पालकमंत्रिपद जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अहमदनगरचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आले. पक्षाने या जागी हसन मुश्रीफ यांची नियुक्ती केली. तर कोल्हापूरचे पालकमंत्रिपद काँग्रेसला गेल्याने तेथे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, थोरात तेथे जाण्यास इच्छुक नव्हते. प्रदेशाध्यक्ष असल्याने कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्रिपद नको, अशी भूमिका घेत त्यांनी पद सोडले. त्याचवेळी मुश्रीफ हेही कोल्हापूरसाठीच आग्रही असल्याने त्यांनीही अनिच्छेनेच अहमदनगरचे पद स्वीकारले. मधल्या काळात अधूनमधूनच ते अहमदनगरला यायचे. त्यावरून भाजपकडून त्यांच्यावर टीकाही केली जात असे. अलीकडेच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर आरोप केले. त्यामुळे ते कोल्हापूरमध्ये अधिकच अडकून पडले. अहमदनगरच्या पूरग्रस्त भागाचा पाहणी दौराही त्यांनी रद्द केला होता. यावरून पुन्हा त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे.
या सर्व परिस्थितीत त्यांनी अहमदनगरचे पालकमंत्रिपदच नको, अशी भूमिका पक्षाच्या बैठकीत घेतली आहे. शुक्रवारपासून मुश्रीफ दोन दिवसांच्या अहमदनगर जिल्ह्याच्या दौर्यावर आले आहेत. अकोले येथे पत्रकारांनी त्यांना या विषयावर छेडले असता त्यांनी पद सोडण्याचा विचार असल्याचे मान्य केले. ते म्हणाले, ‘नगरचे पालकमंत्रिपद सोडण्यासंबंधी आपण बैठकीत मागणी केली आहे. नजीकच्या काळात अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यात एकाच वेळी विविध निवडणुका येत आहेत. दोन्ही जिल्ह्यांत अंतर खूप आहे. त्यामुळे दोन्हीकडे मला न्याय देता येणार नाही. स्वजिल्हा म्हणून मला कोल्हापूरमध्ये जास्त लक्ष घालणे आवश्यक आहे. त्यामुळे अहमदनगरच्या पालकमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे.’ याशिवाय आघाडी सरकार भक्कम आहे, ते कार्यकाळ पूर्ण करेल, असे सांगून ते म्हणाले, पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढेल. अर्थात काही ठिकाणी त्याला अपवादही असेल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी महाविकास आघाडी सोडणार असल्याच्या संदर्भात विचारले असता त्यांनी थेट उत्तर देणे टाळले.
पवारांच्या होकारानंतरच मुश्रीफांचा निर्णय..
अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडण्याचा निर्णय हसन मुश्रीफ यांनी अप्रत्यक्षपणे घोषित केला असला तरी त्यास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या होकारानंतरच घेतला असल्याचे समजते. मुश्रीफांना कोल्हापूरच्या राजकारणात अधिक रस असल्याने व राष्ट्रवादीला कोल्हापूरातील सहकार, स्थानिक राजकारण यावर पगडा ठेवायचा असल्याने पक्षीय हित लक्षात घेता मुश्रीफांना अहमदनगरच्या पालकमंत्रिपदातून मुक्त करणे सोयीचे ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण हे राज्याच्या राजकारणात सक्रीय आहे. त्यामुळे येथे पालकमंत्रिपदासारख्या महत्त्वाच्या पदावर मुत्सद्दी व प्रशासकीय अनुभव असणार्या मंत्र्याची गरज भासणार आहे. पालकमंत्रिपदाच्या माध्यमातून विरोधकांना शह देणे व पक्षीय ताकद वाढविणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेत तनपुरे हे सध्याच्या राजकारणात नवखे असून तरुण आहेत व सध्याच्या राजकारणात प्रशासकीय अनुभव देखील कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक वर्षे मंत्रिपद भोगलेले विरोधक व विविध पक्षांतील प्रस्थापित यांना शह देण्यासाठी त्यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे त्यांच्या ऐवजी अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणाचा अभ्यास असलेले विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे यांच्या नावाचा अधिक विचार केला जावू शकतो.
Tags :

