महाराष्ट्र
37
10
जगण्याची भाषा समजण्यासाठी वाचन महत्वाचे जयंत येलूलकर
By Admin
जगण्याची भाषा समजण्यासाठी वाचन महत्वाचे जयंत येलूलकर
पाथर्डी प्रतिनिधी
विचारांची प्रगल्भता आली तर जीवन सुंदर होते. त्यासाठी भाषेवर मनापासून प्रेम केले पाहिजे. जगण्याची भाषा समजली तर त्यासारखा दुसरा आनंद नाही, परंतु ही भाषा समजण्यासाठी वाचन महत्वाचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य जयंत येलुलकर यांनी केले.
ते येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय मतदार दिन व मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे तर व्यासपीठावर माजी पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे, शब्दगंध साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष शाहीर भारत गाडेकर, मराठी विभागप्रमुख डॉ. सुभाष शेकडे, डॉ. अशोक कानडे, डॉ. बबन चौरे, प्रा. आनंद घोंगडे, डॉ. अभिमन्यू ढोरमारे आदी उपस्थित होते.
जयंत येलूलकर पुढे म्हणाले, भाषेच्या माध्यमातून मूल्य नव्या उंचीवर जात असतात. वाचनातून आपल्याला व्यक्त होता येत. कोरोनाने जगण्याचे संदर्भ बदलले, जी माणसे आपल्यावर जीवापाड प्रेम करायची ती माणसे आपल्याला अर्ध्यावर सोडून गेली. अशा एकलेपणात चांगल्या व सकस वाचनाने आपली साथ दिली. आयुष्यात भावनांचा ओलावा नसेल तर जगण्याला काहीही अर्थ उरत नाही. स्वत:च्या आनंदापेक्षा लोक आपल्याला काय म्हणतील याचाच आपण जास्त विचार करतो. मला इतरांपेक्षा मोठं व्हायचं याच्यापलीकडचे जीवनाचे रंग कोणीही पाहत नाही. इतरांच्या स्वप्नांच्या मागे न धावता आपली स्वतची स्वप्न पहा व ती सत्यात उतरवा. प्रत्येकाच्या आयुष्यात एकदातरी इच्छापूर्तीचा किरण डोकावतो. तो किरण आपल्याला पकडता आला पाहिजे, असे ते शेवटी म्हणाले.
कवी सुभाष सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करतांना विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व विशद करून आपला लोकप्रतिनिधी चांगला व निष्कलंक निवडून देण्यासाठी प्रत्येकाने मतदान करावे व आपल्या कुटुंबियांनाही मतदानासाठी प्रवृत्त करावे असे सांगितले. मतदान हा आपला हक्क आहे. मराठी भाषा व त्याचे महत्त्व पटवून देतांना महाराष्ट्रातील संतांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे.
सातवाहन व यादव काळात मराठी भाषेचा उत्कर्ष होवून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी च्या माध्यमातून जगाला तत्वज्ञान दिले. अनेक उदाहरणे व कविता सादर करून उपस्थितांची दाद त्यांना मिळाली. आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे, म्हणून प्रत्येकाने मतदान करण्याविषयीची शपथ यावेळी सर्वाना देण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात शाहीर भारत गाडेकर यांनी गायलेल्या शाहीर वामनदादा कर्डक यांच्या गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे, सुत्रसंचालन डॉ. अभिमन्यू ढोरमारे तर आभार डॉ. अशोक कानडे यांनी मानले.
Tags :

