दारूची अवैध तस्करी करणारा पिकअप पकडला; 10 लाखांचा माल जप्त
पाथर्डी- प्रतिनिधी
पाच लाख रूपये किंमतीचा देशी- विदेशी दारूचा साठा व एक पीकअप वाहन असा १० लाख १७ हजार ७८४ रूपये किंमतीचा मुद्देमाल पाथर्डी तालुक्यातील वडगाव शिवारात जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी सचिन विठ्ठल शेळके (वय ३६ रा. वडगाव ता. पाथर्डी), बाळासाहेब रामराव जायभाये (रा. पिंपळनेर ता. शिरूर कासार जि. बीड) यांच्याविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पाथर्डी तालुक्यातील वडगाव शिवारात विदेशी मद्याचा साठा असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक ए. बी. बनकर यांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क नगर पथक क्रमांक १ व बीड विभाग यांच्या पथकाने रविवारी सचिन शेळके याच्या घरी छापा टाकला.
मँकडॉल व्हिस्की, बनावट देशी दारू असा सुमारे पाच लाखाची दारू व दारू वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे पिकअप वाहन (क्र. एमएच १६ एवाय ४९१०) पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी सचिन शेळके याला अटक केली आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क, नगर व बीड यांनी संयुक्त मोहिम राबवून केली.