महाराष्ट्र
मोहटादेवी गडावर नवराञ काळात असे असतील निर्बंध
By Admin
मोहटादेवी गडावर नवराञ काळात असे असतील निर्बंध
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी -
राज्य सरकारच्या आदेशानुसार मोहटा देवस्थानमध्ये विविध निर्बंध कायम ठेऊन नवरात्रोत्सव होणार आहे. "नो मास्क, नो दर्शन" या नियमांचे काटेकोर पालन करून मिरवणूक, महाप्रसाद वाटप यासह सार्वजनिक उत्सवांना प्रतिबंध करण्यात आला आहे.
आगामी नवरात्रोत्सव पासून मोहटादेवी मंदिर देवस्थान खुले करण्यासाठी समितीच्या सभागृहात प्रशासकीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी देवदत्त केकाण तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, तहसीलदार शाम वाडकर, पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, सरपंच एरिना पालवे, विश्वस्त यांच्यासह पंचायत समिती, नगरपालिका, आरोग्य विभाग, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, ग्रामपंचायत, आपत्ती व्यवस्थापन, वीज वितरण, पाणीपुरवठा आदी विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर मंदिर उघडणार असल्याने भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू शकते, असे गृहीत धरून संरक्षण व पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे. यावेळी बोलताना प्रांताधिकारी केकाण म्हणाले, ‘देवी दर्शनासाठी पायी चालत येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता पाथर्डी शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमणे, टपऱ्या, नवरात्रोत्सवासाठी पालिका व पोलिसांच्या संयुक्त कारवाई द्वारे हटविण्यात येऊन भाविकांसाठी रस्ता पूर्णपणे खुला ठेवावा. मोहटा मंदिर परिसरात खासगी जागा मालक पार्किंगसाठी मनमानी दर आकारून भाविकांची लूट करतात. अशा तक्रारी नवरात्रीमध्ये वाढतात. ग्रामपंचायत, पोलिस व वन विभागाने संयुक्त निर्णय घेऊन पार्किंगचे दर ठरवावेत. जमीन मालकांनी सहकार्य न केल्यास पंधरा दिवसांसाठी शासनाच्या विशेष अधिकारानुसार जमिनी अधिग्रहीत करून भाविकांना पार्किंग सुविधा महसूल विभागाने द्यावी. नवरात्र काळात देवीच्या गाभाऱ्यात मध्ये जाऊन दर्शन सुविधा पूर्णपणे बंद करण्यात येऊन भाविकांनी रांगेत येऊन सामाजिक अंतराचे पालन करत दर्शन घेऊन निघून जायचे आहे. मंदिर परिसरात खाद्यपदार्थ प्रसाद स्वरूपात वितरित होणार नाहीत. भाविकांना गडावर अथवा भक्त निवास मध्ये मुक्काम करता येणार नाही. पाथर्डी शहरातून देवी गडाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर फिरते पोलिस पथक, तात्पुरती रस्ता दुरुस्ती, मार्गदर्शक सूचनांचे फलक लावा.'
Tags :
9777
10