महाराष्ट्र
पाथर्डी- पाण्यासाठी कार्यालयावर हंडा मोर्चा, पाऊसाचे पाणी पिऊन तहान भागवायची का?
By Admin
पाथर्डी- पाण्यासाठी कार्यालयावर हंडा मोर्चा, पाऊसाचे पाणी पिऊन तहान भागवायची का?
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी नगरपरिषदेकडून शहराला होणार पाणीपुरवठा गेल्या एक आठवड्यापासून विस्कळीत झाला आहे. त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करा, या मागणीसाठी शुक्रवारी माजी नगरसेवक रामनाथ बंग व दीपाली बंग यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी पालिका कार्यालयावर हंडा मोर्चा काढला.
आम्हाला पाणी मिळालेच पाहिजे, अशा जोरदार घोषणा देऊन नगरपरिषदेचे कार्यालय दणाणून सोडले. पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल असे आश्वासन मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी दिल्यानंतर आंदोलकांनी मोर्चा मागे घेतला. महिलांनी नगरपरिषद कार्यालयावर हंडा मोर्चा काढून मुख्याधिकारी यांना धारेवर धरले. जायकवाडी धरणात मोठा पाणीसाठा आहे. तरीही आम्हाला 8 ते 10 दिवसातून अर्धा तास पाणी मिळते. आम्हाला पाणी कोण देणार, असा संतप्त सवाल महिलांनी केला. पावसाचे पाणी पिऊन तहान भागवायची का, असा सवाल मोर्चेकर्यांनी केला.
शहरात गेल्या एक आठवड्यापासून पाणी न सुटल्याने आज रामनाथ बंग यांच्यासह मुमताज शेख, मिनाज शेख, अर्चना देखणे, शोभा राऊत, आरिफा पठाण, अकिला बेग, विजया भागवत, अलका भागवत, अरुणा हाडदे, शमा शेख, पद्मा वनारसे, दिव्या कलंत्री, सलिम शेख, सागर बागडे, सचिन रत्नपारखी, सचिन मुनोत, संजय कुलकर्णी, दिलीप राऊत, जगदीश टाक, योगेश कलंत्री आदींसह नागरिक हंडा मोर्चात सहभागी झाले होते.
मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्याशी चर्चा करून सर्व महिलांनी व्यथा मांडल्या. पाणी प्रश्नाकडे कोणत्याच लक्ष नाही. गढूळ पाणी आठवड्यातून एका वेळेस मिळते. सध्या पाणीपुरवठा विस्कळीत असून पालिकेने दररोज टँकरने शहराला पाणीपुरवठा करावा. पाणीपुरवठा योजना पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. विविध कारणे सांगून वेळ काढूपणा केला जातो. वेळेवर पाणी न दिल्यास पालिका कार्यालयाय कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा मोर्चेकर्यांनी दिला.
रामनाथ बंग म्हणाले की, आम्ही एक वर्षाची पाणीपट्टी भरतो. मात्र पालिका दिवसाआड पाणीपुरवठा करते. तातडीने पाणी सोडा, अन्यथा आम्ही येथून उठणार नाही, असा इशारा बंग यांनी दिला. या मोर्चाला पालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे व पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अशोक डोमकावळे हे सामोरे गेले. त्यांनी शेवगाव ते अमरापूर या ठिकाणी विजेचा तांत्रिक बिघाड सातत्याने होत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे सांगून तातडीने अधिकार्यांशी बोलून हा बिघाड दूर करत पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
Tags :
29997
10