महाराष्ट्र
सकारात्मक दृष्टीकोन व दुर्दम्य इच्छाशक्ती हीच स्पर्धा परीक्षा यशाची गुरुकिल्ली – आयपीएस महेश गीते
By Admin
सकारात्मक दृष्टीकोन व दुर्दम्य इच्छाशक्ती हीच स्पर्धा परीक्षा यशाची गुरुकिल्ली – आयपीएस महेश गीते
पाथर्डी- प्रतिनिधी
कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी फक्त हुशार असणे महत्वाचे नसून इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, मानसिकदृष्ट्या कणखर व अपयशातून शिकण्याची कला अवगत असणे, या गोष्टीही तितक्याच महत्वाच्या आहेत. आपल्याला कोणत्या क्षेत्रात करियर करायचे हे सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी ठरवणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षा ही खूप वेळखाऊ प्रक्रिया असून त्यासाठी संयम असणे खूप महत्वाचे आहे. प्रयत्नात सातत्य, सकारात्मक दृष्टीकोन, कठोर मेहनत व दुर्दम्य इच्छाशक्ती ही स्पर्धा परीक्षेतील यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन तेलंगना येथील आयपीएस अधिकारी महेश गीते यांनी केले.
ते येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे तर व्यासपीठावर सुनिता गीते, प्रा. प्रदिप वारूळकर, स्पर्धा परीक्षा समन्वयक प्रा. किरण गुलदगड, प्रा. आशा पालवे आदी उपस्थित होते.
महेश गीते पुढे म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी निर्णयक्षमता हा गुण असणे अतिशय आवश्यक आहे. यूपीएससी परीक्षा निर्णय घेणारे अधिकारी घडविते तर एमपीएससी परीक्षा निर्णयांची अंमलबजावणी करणारे अधिकारी घडविते. स्पर्धा परीक्षेसाठी कोणत्याही क्षेत्रातील पदवी असली तरी चालते, परंतु त्या क्षेत्रातील सर्वसमावेशक ज्ञान विद्यार्थ्याकडे असणे अतिशय आवश्यक आहे. सध्या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रचंड स्पर्धा असून या परीक्षांचा सक्सेस रेट खूप कमी आहे. ही परीक्षा सापशिडीच्या खेळासारखी असून मुलाखतीत अयशस्वी झाल्यावर परत पूर्व परीक्षेपासून सुरुवात करावी लागते, म्हणून प्रत्येकाने या क्षेत्रात करियर करण्याअगोदर दहा वेळा विचार करावा. प्रत्येकासाठी वेळ खूप मौल्यवान असून या क्षेत्रात करियर करायचे असल्यास दिवस रात्र एक करून अभ्यास करा, यश निश्चित मिळेल, असे ते शेवटी म्हणाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या स्पर्धा परीक्षाविषयीच्या शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुरेखा चेमटे, सुत्रसंचालन प्रा. आशा पालवे तर आभार प्रा. मोहम्मदसलीम शेख यांनी मानले.
Tags :
82849
10