नाशिक - कोरोनाचा कहर! आदिवासी आयुक्तालयात सात कर्मचारी पॉझिटिव्ह; कार्यालय बंद ठेवण्याची मागणी
नाशिक - प्रतिनिधी
आदिवासी विकास विभागातील अपर आयुक्तालयातील सात कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आदिवासी आयुक्तालय तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याची मागणी आता होऊ लागली आहे.
कोरोनाचा कहर! आदिवासी आयुक्तालयात कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा
काही दिवसांपूर्वी अपर आदिवासी आयुक्तालयातील अधिकारी कोरोनाबाधित आढळले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासह आयुक्तालयातील सर्वच २२ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यात आले. त्यानंतर त्यांचा अहवाल आला असता यातील सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले, तर आणखी आठ कर्मचाऱ्यांनाही लागण झाल्याची माहिती समोर येत होती.
उर्वरित कर्मचाऱ्यांचा अहवाल प्रलंबित आहे. यामुळे आदिवासी आयुक्तालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारण्याची वरिष्ठांशी चर्चा
या सर्व पार्श्वर्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून उपायुक्त सुदर्शन नगर यांनी तत्काळ सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपला अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले. पुढील तीन दिवस आयुक्तालय बंद ठेवत सॅनिटाझेशन करण्याची मागणी कर्मचारी व अधिकारी यांनी केली. ही सर्व परिस्थिती बघता आणि खबरदारीचा उपाय म्हणून आदिवासी आयुक्तालय बंद करण्याबाबत किंवा 'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारण्याची वरिष्ठांशी चर्चा केली जाणार आहे. तसेच आदिवासी आयुक्तालयात कामासंदर्भात येणाऱ्या अभ्यागत यांच्यावर नियंत्रण आणले जाणार आहे.