सरपंचाला मारहाण करणारा अखेर जेरबंद
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील मुंगी येथील सरपंचास कोयत्याने मारहाण करीत जखमी करुन फरार झालेला आरोपी प्रमोद गायकवाड व त्यास घरामध्ये आश्रय दिलेला वसंत दशरथ गव्हाणे यास पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या पथकाने अटक केली आहे.
सरपंच दादासाहेब भुसारी हे ग्रामपंचायत पथकासह मंगळवार ता.19 रोजी ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा पाईपलाईनवरुन घेतलेले अनाधिकृत नळ कनेक्शन नियमित करुन घे, असे सांगण्यासाठी प्रमोद पंढरीनाथ गायकवाड याच्या घरी गेले होते.
याचा राग आल्याने आरोपी प्रमोद याने सरपंच भुसारी यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करून जखमी केले. तसेच ग्रामसेवक सुनील काळे यांनाही धक्काबुक्की केली. सरपंच भुसारी यांच्या फिर्यादीवरुन गायकवाड याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. घटनेनंतर आरोपी गायकवाड हा पसार झाला होता.