अवैध धंदे तातडीने बंद करा अन्यथा आमरण उपोषण
भ्रष्टाचार समितीचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष शन्नो पठाण यांचा इशारा
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी शहर व तालुक्यातील अवैध धंदे व ऑनलाईन रोलेट गेम बंद करावी, अशा आशयाचे निवेदन भ्रष्टाचार समिती अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष शमाअली पठाण उर्फ शन्नो पठाण यांनी पाथर्डी- शेवगाव चे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी देवदत्त केकाण यांना देण्यात आले आहे.
पठाण यांनी निवेदनात म्हटले आहे की, पाथर्डी शहर व तालुक्यामध्ये अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असून यामध्ये प्रामुख्याने जुगार, मटका, ऑनलाईन रोलेट गेम चक्री, सट्टा (आयपीएल), हातभट्टी, ताडी तसेच अवैध दारू विक्री सर्रासपणे चालू असून त्याकडे पाथर्डी पोलिसांचे दुर्लक्ष आहे.
तरी मे. साहेबांस नम्र विनंती की, वरील अवैध व्यवसायांचा त्वरित बंदोबस्त करून पुढील आठ दिवसात यावर कडक कारवाई करावी, अन्यथा मी पाथर्डी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सारखे आंदोलन करील, याची नोंद घ्यावी व त्याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी साहेबांची राहील याची नोंद घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.