पाथर्डी-नगर रस्त्यावर खड्डे चुकविताना सिमेंटचा ट्रक उलटला
नगर सिटीझन टिम प्रतिनिधी
नगरहून पाथर्डीकडे सिमेंट गोण्या घेऊन जाणारा ट्रक खड्डा चुकविताना रस्त्यावरच उलटला. या अपघातामध्ये एक वृद्ध गंभीर जखमी झाले असून, ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे.
नगर- पाथर्डी रस्त्यावर कौडगावजवळ शनिवारी सकाळी ही घटना घडली. दामू भिमाजी खर्से (वय 65, रा जाब-कौडगाव असे अपघातात जखमी झालेल्या वृद्धाचे नाव आहे. नगर-पाथर्डी रस्ता मेहेकरी, जाब,कौडगाव मराठवाडी, करंजी, देवराई, तिसगाव, निवडूंगेपर्यंत अतिशय खराब झाला आहे. रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. खड्डे चुकविताना मोटरसायकल स्वारांचे सातत्याने अपघात होत आहेत.
त्याचबरोबर मोठी वाहने देखील खड्डे चुकविताना उलटून त्यांचेही आता अपघात होत आहेत. या अपघातांत अनेकजण नाहक जखमी होत आहेत. जाब-कौडगाव-मराठवाडी दरम्यान महामार्गावर पडलेले खड्डे पाहून अक्षरशः वाहन चालकाच्या मनात धडकी भरते. महामार्गावरील खड्डे डांबर टाकून कधी दुरुस्त करणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. खराब रस्ता व खड्ड्यांमुळे अपघात वाढले असून, संबंधित ठेकेदाराविरोधात लवकरच जनहित याचिका दाखल करून सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती नगर तालुका बाजार बाजार समितीचे माजी संचालक बाबा पाटील खर्से, बंटी लांडगे यांनी दिली.
महामार्ग नव्हे अमरधामकडे नेणारा मार्ग
कल्याण-विशाखापट्टणम महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे अनेकदा वाहतुकीस अडथळे येऊन अपघात होत आहेत. यात वाहनचालकांसह प्रवाशांना जीव गमवावा लागत आहे. महामार्गाची अवस्था दयनीय बनल्याने वाहनचालकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून, तो अमरधामकडे नेणारा मार्ग बनल्याची उपरोधिक टीका प्रवाशांमधून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या महामार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.