शेवगाव तालुक्यासह 'या' चार तालुक्यामध्ये आतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पाच तालुक्यांत शेती पिकांचे नुकसान झाले आहे. यात अकोले तालुक्यात सर्वाधिक 432 हेक्टरवरील पिकांना तडाखा बसला आहे.
तर संगमनेर, श्रीगोंदा, शेवगाव आणि जामखेड तालुक्यात काही प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.
नगर जिह्यावर यंदा वरुणराजा सुरुवातीपासून मेहरबान होता. जून आणि जुलै महिन्यांत अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली. काही भागात ढगफुटीसदृश पाऊस झाला. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिल्हा जून आणि जुलै महिन्यांत 114 टक्क्यांच्या सरासरीने 234 मिलिमीटर पाऊस झालेला आहे. जून महिन्यांत संगमनेर तालुक्यात 110 हेक्टर, श्रीगोंदा तालुक्यात 8.87 हेक्टर, शेवगाव तालुक्यात 5 हेक्टर आणि जामखेड तालुक्यात 2.93 हेक्टर शेती पिकांचे नुकसान झालेले आहे. तर, अकोले तालुक्यात जुलै महिन्यांत 432.82 हेक्टरवर शेती पिकांचे नुकसान झालेले आहे. याबाबत अहवाल कृषी विभागाकडून जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आलेला आहे.
सोयाबीनला फटका
अनेक ठिकाणी सततच्या पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकाला त्याचा फटका बसला आहे. तसेच यलो मोझाईक रोगामुळे सोयाबीनला फळ लागत नसल्याची तक्रार शेतकऱयांकडून होताना दिसत आहे. पेरणी, फवारणी, खुरपणी इतर मशागतीचा खर्चाने शेतकरी हैराण असताना परत दुसरे संकट या शेतकऱयांवर आले आहे.