Breaking-वाटेत धक्कादायक प्रकार सोसायटी फेडण्यासाठी बहिणीकडून उसणे पैसे घेऊन येणाऱ्या भावासोबत घडला
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
विविध कार्यकारी सोसायटीकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी एकाने आपल्या बहिणीकडून एक लाख रुपये उसणे घेतले.
अहमदनगरमधून विविध गैर कृत्याच्या बातम्या येत असतात. आता आणखी एक वृत्त याबाबत आले आहे.
परंतु माघारी जाता वाटेतच त्याला अनुचित प्रकारास सामोरे जावे लागले.
चोरटयांनी वाटेतचं बसमध्ये या पैशावर डल्ला मारला. त्यातील पन्नास हजार रुपयांच्या नोटांचा बंडल चोरट्यांनी पळवून नेला.
सदर युवकाचे नाव दत्तात्रय महादू शेडगे असे असून ते नगर तालुक्यातील रुईछत्तीशी परिसरातील मठ पिंपरी येथील रहिवासी आहेत. तर हा प्रकार श्रीरामपूर येथील बसस्थानकात घडला आहे.
अधिक माहिती अशी : दत्तात्रय शेडगे यांनी सोसायटीकडून कर्ज घेतले होते. त्याची परतफेड करण्यासाठी पैसे हवे असल्याने ते श्रीरामपूर तालुक्यातील बहिणीकडे गेले होते.
बहिणीकडून शेडगे यांनी एक लाख रूपये घेतले. पन्नास हजार रुपयांच्या नोटांचे दोन बंडल, अशा स्वरूपात ती रक्कम होती. ते दोन्ही बंडल त्यांनी खिशात ठेवले आणि घरी पुन्हा येण्याच्या हिशोबाने ते श्रीरामपूर बसस्थानकात आले.
तेथे श्रीरामपूर-नगर या एसटी बसमध्ये चढत असताना चोरट्याने एका खिशातील ५० हजार रुपयांचा एक बंडल काढून घेतला. गाडीत बसल्यावर त्यांचे हे लक्षात आले.
त्यांनी लगेच याची माहिती वाहक व चालकाला दिली. तोपर्यंत नगरकडे निघालेली ही बस थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आली. पोलिसांनी शेडगे यांची तक्रार नोंदवून घेतली.