पाथर्डी- 'या' गावातून दीड लाखाचा ऐवज चोरट्यांनी लांबविला
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथील बंगल्याच्या बंद खोलीतील कपाटातून चोरट्यांनी रोख रक्कम, तसेच दागिने असा एक लाख चोपन्न हजारांचा ऐवज लांबविला.
ही घटना शनिवारी (दि.30) पहाटे तीनच्या सुमारास घडली.
येथील जगन्नाथ किसन बडे आणि त्यांचे भाऊ साहेबराव किसन बडे व परिवारातील इतर सदस्य शुक्रवारी रात्री जेवण करून दहाच्या सुमारास झोपले होते. पहाटे तीनच्या सुमारास ते झोपलेल्या खोल्यांच्या दाराच्या कड्या बाहेरून लावून घेत, ही चोरी करण्यात आली आहे.
बडे यांना पहाटे जाग आल्यानंतर बाहेरून कडी लावल्याचे लक्षात आले. त्यांनी शेजारी राहणारे केशव बडे यांना फोन करून बोलावून घेत दरवाजा उघडला असता सदर खोलीचे कुलूप तोडल्याचे दिसून आले. घरात जाऊन पाहिले असता त्यांना कपाटातील कपडे व वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या व त्यातील दागिने व रोख रक्कम गायब झाल्याचे दिसून आले.
याबाबत जगन्नाथ किसन बडे यांनी पाथर्डी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी श्वान पथकासह येऊन पाहणी केली. परंतु, चोरट्यांनी वाहनांचा वापर केल्याने माग निघू शकला नाही. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पोलिसांनी परिसरात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी केली जात आहे.