महाराष्ट्र
खंडणीच्या मागणीला कंटाळून पोलिसाची आत्महत्या, पोलीस ठाण्यातील एक अधिकारी, तीन पोलिसांवर गुन्हे दाखल
By Admin
खंडणीच्या मागणीला कंटाळून पोलिसाची आत्महत्या, पोलीस ठाण्यातील एक अधिकारी, तीन पोलिसांवर गुन्हे दाखल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अकोले तालुका पोलीस ठाण्यातील एक अधिकारी आणि तीन पोलीस कर्मचाऱयांकडून होणाऱ्या खंडणीच्या मागणीला कंटाळून मुळा धरणावरील सुरक्षा चौकीवर नियुक्त असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलने सर्व्हिस बंदुकीतून स्वतःच्या गळ्यावर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.
मुळा धरणाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पोलीस चौकीत शनिवारी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्याचे एक पोलीस अधिकारी आणि एक महिला आणि दोन पुरुष अशा चार पोलीस कर्मचाऱयांवर राहुरी पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाऊसाहेब दगडू आघाव (वय 52, रा. बारागाव नांदूर, ता. राहुरी) असे मृत पोलीस कर्मचाऱयाचे नाव आहे.
मुळा धरणाच्या सुरक्षेसाठी धरणाच्या प्रवेशद्वारावर राहुरी पोलिसांची चौकी आहे. कॉन्स्टेबल भाऊसाहेब आघाव यांची सहा महिन्यांपूर्वी नगर मुख्यालयातून मुळा धरणावर बदली झाली होती. शनिवारी सकाळी बारागाव नांदूर येथील घरातून निघालेले आघाव सव्वानऊ वाजता मुळा धरणावरील सुरक्षा चौकीत कामावर हजर झाले होते. मात्र, पावणेदहा वाजेच्या सुमारास चौकीच्या रूममध्ये गोळीबाराचा आवाज झाल्याने मुळा पाटबंधारे विभागातील कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी रूमचा दरवाजा आतून बंद होता. मुळा पाटबंधारे विभागातील कर्मचाऱयांकडून राहुरी पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दरवाजा तोडून रूममध्ये पाहणी केली असता, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला भाऊसाहेब आघाव यांचा मृतदेह आढळून आला. आघाव यांच्या गळ्यातून डोक्यात घुसलेली गोळी रूमच्या छताला असलेल्या पत्र्याला छेद देऊन बाहेर गेली होती. आघाव यांनी चिठ्ठी लिहून
ठेवल्याची तसेच 9 वाजून 41 मिनिटांनी आत्महत्या करीत असल्याचा मेसेज मुलगा पंकजच्या मोबाईलवर पाठविल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली.
दरम्यान, जिल्हा पोलीसप्रमुख मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी मुळा धरणावरील सुरक्षा चौकीला भेट देऊन घटनेची पाहणी केली. राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व पोलीस कर्मचाऱयांनी गोळीचा शोध घेतला. मात्र, बंदुकीतून फायर झालेली गोळी सापडली नाही. आघाव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी लोणी येथील रुग्णालयात हलविण्यात आला.
दरम्यान, आघाव यांच्या आत्महत्येचा मेसेज सोशल मीडियावर गेल्याने संतप्त नातेवाईकांनी शनिवारी दुपारपासून सायंकाळपर्यंत राहुरी पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले. आघाव यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱयांवर गुन्हे दाखल करून ताब्यात घेतल्याशिवाय मृतदेहदेखील ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने पोलीस प्रशासनासमोर मोठा पेच प्रसंग निर्माण झाला होता. अखेर राहुरी पोलिसांनी अकोले पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱयासह 2 पुरुष आणि एका महिला कर्मचाऱयावर आत्महत्येस प्रवृत्त करणे व खंडणीची मागणी या कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली. त्यानंतर नातेवाईकांनी आघाव यांचा मृतदेह ताब्यात घेतला.
दरम्यान, मुळा धरणाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱयाने आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर मुळा पाटबंधारे विभागातील अधिकारी दुपारी उशिरापर्यंत घटनास्थळी हजर झाले नव्हते.
Tags :
15893
10