Breaking- 'या' प्रकल्पाचे पाणी देण्यास पुण्यातील नेत्यांचाच विरोध - आ.विखे
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कुकडी प्रकल्पातील डिंभे ते माणिकडोह प्रकल्पातून पाणी देण्यास पुणे जिल्ह्यातील नेत्यांचाच विरोध असल्याचे आता स्पष्ट झाले आहे, असा आरोप भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केला.
शेतकऱ्यांचा अधिक अंत पाहू नका. कुकडी प्रकल्पाच्या रखडलेल्या कामास तातडीने गती देऊन, वर्षानुवर्षे पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनुदानाच्या मागण्यांवर बोलताना आमदार विखे पाटील यांनी जलसंपदामंत्र्यांचे या रखडलेल्या प्रकल्पाकडे लक्ष वेधले. वर्षानुवर्षे कुकडी प्रकल्पातील डिंभे ते माणिकडोह या प्रकल्पाच्या कामास पूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी गती दिली होती. दीडशे किलोमीटरचे काम त्या काळात पूर्ण झाले होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनीही या प्रकल्पाच्या कामास प्राधान्याने सुरवात केली होती. मात्र, आघाडी सरकारच्या काळात या कामाचे घोडे अडले कुठे, असा प्रश्न उपस्थित करून, हा प्रकल्प जाणीवपूर्वक होऊच द्यायचा नाही अशी भूमिका सरकारमधील एका मंत्र्यांची असल्याची टीका त्यांनी केली.
मुळातच १८०० क्यूसेकने वाहणारा डावा कालवा सध्या ७५० ते ८०० क्यूसेकने वाहतो. त्यामुळे या कालव्याची वहनक्षमता ४५० ने कमी झाली असल्याची बाब उपस्थित करतानाच, यामुळेच नगर जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, याकडे लक्ष वेधून, या प्रकल्पासाठी वाटेल ती आर्थिक तरतूद करा. कर्जत, श्रीगोंदे, पारनेर या तालुक्यांतील शेतक-यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळू द्या, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.