डोळ्यात मिरची पूड टाकून 80 हजार लांबविले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
भर दुपारी डोळ्यात मिरची पावडर टाकून 80 हजार रुपये लुटल्याची घटना एरंडगाव ते जुने दहिफळ रस्त्यावर घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, जुने दहिफळ येथील गणेश राजू परदेशी (वय 31) हे शनिवारी (दि.30) म्हैस घेण्यासाठी एरंडगाव समसुद येथील कॅनरा बँकेतून 80 हजार रुपये काढून आपल्या मोटारसायकलवरून घरी जात होते.
दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान एरंडगाव ते जुने दहिफळ रस्त्यावर हॉटेल प्रणवजवळ समोरून नंबर प्लेट नसलेल्या पल्सर मोटारसायकलवरून दोघेजण आले. त्यांनी आपला चेहरा झाकलेला होता. त्यांनी परदेशी यांच्या मोटारसायकलला त्यांची मोटारसायकल आडवी लावून, त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. त्यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील 80 हजार रुपये चोरून ते पसार झाले.
डोळ्यात मिरची पूड गेल्याने गणेश परदेशी हे जोरजोरात ओरडत होते. त्याचा आवाज ऐकून तेथे काही नागरिक जमा झाले व त्यांनी त्यांना सावरले. याबाबत गणेश परदेशी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून शेवगाव पोलिसांनी दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.