पाथर्डी- गळफास घेणाऱ्या शेतकऱ्याचे बालकाने वाचविले प्राण, तालुक्यातून होतेय कौतुक
'या' गावातील घटना
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेतकऱ्याचे प्राण वाचवणाऱ्या अथर्व अशोक खेडकर या मुलाचे तालुक्यातून कौतुक होत आहे.
अवघ्या 13 वर्षांच्या मुलाने गळफास घेणाऱ्या शेतकऱयाचे प्राण वाचवण्याची घटना तालुक्यातील कोल्हार येथे घडली आहे. यामुळे 'काळ आला होता, मात्र वेळ आली नव्हती', असे म्हणण्याची वेळ आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यावर आली आहे.
अथर्व खेडकर (रा. चिंचपूर इजदे) हा शाळेला सुट्टी असल्याने आपल्या मामाच्या तालुक्यातील कोल्हार या गावी आला होता. 24 एप्रिल रोजी तो मामाच्या घराबाहेर उभा असताना एका महिलेचा 'वाचवा वाचवा, मदत करा' असा आवाज ऐकल्याने तो धावत गेला असता, शेजारील शेतात बाळासाहेब विष्णू पालवे (वय 37) हा शेतकरी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. धाडस दाखवत अथर्व हा त्याच्याजवळ गेला व त्याने पालवे याचे दोन्हीही पाय खालून उचलून धरले. पालवेच्या पत्नीच्या आवाजाने शेजारील शेतकऱयांनीही धाव घेऊन पालवे याला खाली उतरवत नगर येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, अथर्वने दाखविलेल्या धाडसामुळे कोल्हार ग्रामपंचायतीने ठराव करून अथर्वच्या धाडसाचे कौतुक केले आहे, तर पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनीही अथर्वचा गौरव केला.