१ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या मुलींच्या नावे पाच हजार रुपयांचे फिक्स डिपाॅझीट करणार
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त नानासाहेब पडळकर यांचा स्तुत्य उपक्रम
पाथर्डी प्रतिनिधी-
भाजपचे फायरबॅन्ड नेते व धनगर आरक्षण लढ्याचे नेतृत्व करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दि. १ ऑक्टोबर रोजी उपजिल्हा रुग्णालय, पाथर्डी येथे जन्म घेणाऱ्या मुलींच्या भवितव्यासाठी पाच हजार रुपयांचे बॅंकेत फिक्स डिपाॅझीट करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य जय मल्हार युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व गोपीचंद पडळकर यांचे समर्थक युवानेते नानासाहेब पडळकर यांनी सांगितले .
दि. १ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या मुलींच्या आईच्या नावाने प्रत्येकी पाच हजार रुपयांचे फिक्स डिपॉझिट करण्यात येणार आहे.
धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाथर्डी तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. आ. पडळकर आपल्या आक्रमक भूमिकेमुळे व धनगर आरक्षण नेतृत्वामुळे महाराष्ट्रातील धनगर समाजातील युवकांमध्ये अतिशय लोकप्रिय ठरत आहेत.
३० सप्टेंबर रोजी रात्रौ १२ वाजल्या पासुन ते दि.१ ऑक्टोबर रात्रौ १२ वाजेपर्यंत या कालावधीत जन्मलेल्या मुलींच्या आईच्या नावाने पाच हजार रुपयांची मुदत ठेव १८ वर्षाच्या मुदतीकरता बॅंकेत ठेवण्यात येणार आहे.
उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक यांना तसे कळविण्यात आले असुन उपजिल्हा रुग्णालयातील प्रमाणपत्राच्या आधारे फिक्स डिपॉझिटची पावती संबंधितांना दिली जाणार आहे. स्त्रीभृण हत्या आणि कमी झालेला मुलींचा जन्मदर या बाबी लक्षात घेता या उपक्रमाला महत्व प्राप्त झाले आहे. आ. पडळकर यांचा वाढदिवस वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप आदी सामाजिक उपक्रमातुन साजरा करत त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यात येणार असल्याची माहिती नानासाहेब पडळकर यांनी दिली.