महाराष्ट्र
10165
10
स्टडी क्लब बंद पाडण्याचा घाट; तहसीलवर मोर्चा
By Admin
स्टडी क्लब बंद पाडण्याचा घाट; तहसीलवर मोर्चा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी नेवासा शहरात यशवंत स्टडी क्लब नावारूपाला आले; परंतु माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी राजकीय सूडभावनेतून हा स्टडी क्लब बंद पाडण्याचा घाट घातल्याचा आरोप करत त्या निषेधार्थ तालुक्यातील विद्यार्थी, पालक अशा 250 जणांनी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला.
स्टडी क्लब सुरू राहावा यासाठी निवेदन दिले. यशवंत स्टडी क्लबचे विद्यार्थी गीता अंबाडे, महेश निकम तसेच सामाजिक कार्यकर्ते महेश मापारी, नंदकुमार पाटील, सतीश पिंपळे आदींनी भाषण करून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा निषेध नोंदवला.
नेवासा शहरात पंचायत समितीच्या आवारातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या भव्य इमारतीमध्ये यशवंत स्टडी क्लब आहे. हा क्लब आमदार शंकरराव गडाख यांच्या कल्पनेतून शहरासह परिसरातील अनेक विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भवितव्य घडवत असतो. परंतु हाच स्टडी क्लब नेवासाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी बंद पाडण्याचा घाट घातल्याच्या संतप्त प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
पंचायत समिती आवारातील सार्वजनिक बांधकाम खात्याची ही इमारत धूळ खात पडलेली होती. अनेक विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांनी आमदार गडाख यांची भेट घेऊन सदरच्या वास्तूची डागडुजी करून, शैक्षणिक साहित्य, फर्निचर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तज्ज्ञ, प्राध्यापक वर्ग व कायमस्वरूपी व्यवस्थापक यांची नियुक्ती करून स्टडी क्लब सुरू करण्याची मागणी केली. त्यानुसारच आमदार गडाख यांनी व्यक्तिगत खर्च करून हा स्टडी क्लब सुरू केला. या स्टडी क्लबमधून नुकतेच नेवासा तालुक्यातील पाच विद्यार्थ्यांची मुंबई येथे पोलिस म्हणून नियुक्ती झाली आहे.
या निषेध मोर्चात नंदकुमार पाटील, सतीश पिंपळे, लक्ष्मणराव जगताप, महेश मापारी, काकासाहेब गायके, नीलेश पाटील, असिफ पठाण, सुलेमान मणियार, राजेंद्र सानप, संदीप बेहळे, बाळासाहेब वाघ, विशाल सुरडे, सचिन नागपुरे, स्वप्नील मापारी आदी उपस्थित होते.
बाळासाहेब मुरकुटे यांना धडा शिकविणार: सतीश पिंपळे
सतीश पिंपळे म्हणाले, की मुरकुटे यांनी मुळा एज्युकेशन सोसायटी, मुळा कारखाना इथेनॉल प्रकल्प बंद पाडण्याचा प्रयत्न केला. शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या विरोधात अर्ज करून मुलांना नोकरीवरून कमी करण्यासाठीही प्रयत्न केले. मार्केट कमिटी संचालकांविरुद्ध दरोड्याचे गुन्हे दाखल करून संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. नेवाशातील स्टडी क्लब बंद पाडण्याचा घाट घातला आहे, तो आम्ही कदापिही यशस्वी होऊ देणार नाही.
Tags :
10165
10





