महाराष्ट्र
छोट्या वाहनांमधून होणारी वाळूतस्करी टार्गेटवर, महसूलची धडक कारवाई
By Admin
छोट्या वाहनांमधून होणारी वाळूतस्करी टार्गेटवर, महसूलची धडक कारवाई
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
दिवसेंदिवस गंभीर बनलेल्या अवैध वाळूउपसा आणि वाहतुकीविरोधात संगमनेरच्या महसूल विभागाने कारवाया सुरू केल्या आहेत. एकाचवेळी वाळूची अवैध वाहतूक करणारी पाच वाहने महसूल विभागाच्या पथकाने पकडली आहेत.
या सर्वांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.
महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अवैध वाळूउपसा करणाऱया वाळूतस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. महसूलच्या पथकाने शहर व परिसरातून ही वाहने पकडली आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारने गौण खनिजाबाबत कडक धोरण अवलंबिले आहे. याचा फटका वाळूतस्करांना बसला असून, महसूल विभागाने अवैध वाळूतस्करी विरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
महसूल विभागाने नगर जिह्यात अवैध गौण खनिजाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे महसूल खाते ऍक्शन मोडवर आले आहे. त्यामुळे वाळूतस्करांनी ट्रक्टरसह मोठय़ा वाहनांचा वापर टाळत वाळूतस्करीसाठी छोटी वाहने वापरण्यास सुरुवात केली. छोटय़ा वाहनातून वाळू तस्करी होत असल्याने त्या विरोधात महसूलच्या पथकाने मंगळवारी पहाटे विविध ठिकाणी धाडसत्र राबविले. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे तहसीलदार अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार उमाकांत कडनोर व गणेश तळेकर यांच्या नेतृत्वाखाली कामगार तलाठी पोमल तोरणे व अन्य तहसीलदारांच्या पथकाने ही वाहने पकडली.
पथकाने पकडलेल्या वाहनांमध्ये मंगळापूर येथे जीपमधून, राजापूर येथे पिकअप जीपमधून, कासारवाडी येथे पॅगो रिक्षातून, खांडगाव येथे पिकअपमधून, तर शहरात रिक्षातून वाळू वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे.
पथकाने ही पाचही वाहने ताब्यात घेतली आहेत. त्यामुळे शासनाने गौण खनिजाबाबतीत आणलेले निर्बंध झुगारून अवैधरीत्या वाळू वाहतूक सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, या विरोधात महसूल प्रशासनाने कारवाईत सातत्य राखण्याची आवश्यकता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
Tags :
52764
10