महाराष्ट्र
18148
10
दोन कारचा भीषण अपघात; एअर बॅग फुटून रस्त्याच्या
By Admin
दोन कारचा भीषण अपघात; एअर बॅग फुटून रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या व्यक्तीचा मृत्यू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
रस्त्यावर उभा असलेल्या स्विफ्ट कारला भरधाव वेगाने आलेल्या टाटा पंच कारने धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. हा अपघात मंगळवारी (दि. 9) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास नेवासा - शेवगाव राज्य मार्गावरील भेंडे बुद्रूक येथे झाला.
या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर नेवासा फाटा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भेंडे बुद्रूक येथील लोकनेते मारुतराव घुले – पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशव्दारासमोरील ज्ञानेश्वर स्विट मार्टजवळ स्विप्ट डिझायर (क्रमांक एम. एच.१२ बी.सी.४२००) कार उभी होती. या कारला शेवगांवहून श्रीरामपुरकडे भरधाव वेगात जाणाऱ्या टाटापंच कारने (क्रमांक एम.एच.१७ सीआर ४२९१) जोराची धडक दिली.
या भीषण अपघातात जोराचा आवाज होवून टाटापंच कारची एअरबॅग फुटली. त्यामुळे रस्त्यावरुन जाणारा सुरेश यादव आढागळे (वय ४८, रा.नागापूर, ता.नेवासा) हे या अपघातात वर उडून गंभीर जखमी होवून जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली. तर मनोज रामभाऊ अस्वले (वय ४५, रा.भेंडा, ता.नेवासा) हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नेवासा फाटा येथील साईसेवा रुग्णालयात औषधोपचार सुरु असून मृतक सुरेश आढागळे यांचे शव नेवासा फाटा येथील ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघात घडल्यानंतर दोन्ही वाहने बाजूला घेईपर्यंत वाहतुक कोंडी झालेली होती. जखमींना लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात तातडीने मदत झालेली होती.
लोकनेते मारुतराव घुले – पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गेट समोरील नेवासा – शेवगांव रस्त्यावर खड्डे पडलेले असून खड्डा चुकविण्याच्या नादात हा अपघात घडला असल्याचे यावेळी अपघातस्थळी झालेल्या गर्दीतील लोकांकडून बोलले जात होते.
Tags :
18148
10





