महाराष्ट्र
105306
10
भाजप पक्षाने पंकजा मुंडेसह अनेक नेत्याना वापरुन बाजुला केलं
By Admin
भाजप पक्षाने पंकजा मुंडेसह अनेक नेत्याना वापरुन बाजुला केलं - सुषमा अंधारे यांचा भाजपवर हल्लाबोल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
भाजपने पंकजा मुंडे यांनाच नाही तर अनेकांना वापरून घेतलं. यात लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, सदाभाऊ खोत, राजु शेट्टी, महादेव जानकर आदी नेत्यांना भाजप पक्षाने वापरून घेत बाजूला केल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आज अहमदनगर दौऱ्यावर होत्या, यावेळी त्या बोलत होत्या.
अंधारे म्हणाल्या की, भाजपने पंकजा मुंडे यांनाच नाही तर अनेकांना वापरून घेतलं. केंद्रीय राजकारणापासून ते महाराष्ट्रातील राजकारणापर्यंत अनेक नेते असे आहेत की त्यांना भाजप पक्षाने वापरून घेतलं आणि बाजूला सारलं. या नेत्यांच्या वोट बँकेचा पुरेपूर वापर करून घेतला. अनेकांनी आश्वासने दिली. अनेकांनी तात्पुरती मंत्री पदेही दिली. मात्र त्यानंतर अलगद बाजूला काढून टाकण्यात आले. यात देवेंद्र फडणवीस यांचा हातखंडा असल्याचे सांगत सुषमा अंधारे यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
नगर-पाथर्डी रोडच्या दुरवस्थेबाबत सुषमा अंधारे यांनी भाजपच्या स्थानिक आमदार मोनिका राजळे यांना टोला लगावला. अंधारे यावेळी म्हणाल्या की, पाथर्डीकडे येणारे रस्ते एवढे गुळगुळीत होते की, माझी गाडी सटकत होती, मी जपून-जपून गाडी चालवत आले. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर यावे म्हणून आम्ही असे दौरे आणि कार्यक्रम घेत आहोत.
अंधारे पुढे म्हणाल्या की, खेडच्या सभेनंतर विरोधकांनी शिमगा केला. ते म्हणत होते की या सभेसाठी आम्ही गर्दी केली पण आम्ही पत्रकारांना आवाहन केलं की तुम्हीच सभेतील लोकांना विचारा तुम्हाला कुणी जमवलं की तुम्ही स्वतःहून आलात. सध्याच्या कृषी मंत्र्यांना रूम्हण कशाला म्हणतात, औत कशाला म्हणतात, नांगर कशाला म्हणतात हेच माहिती नाही. अधिवेशनात बेरोजगारी, महागाई शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला हवे होते, ते करण्याऐवजी ते इतरांवर हक्क भंग वैगेरे करण्यात व्यस्त होते, असा सणसणीत टोलाही त्यांनी यावेळी शिंदे गटाला लगावला आहे.
त्या म्हणाल्या, चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकली तेंव्हा चंद्रकांत पाटील म्हणत होते की, मला केस करायची नाही. तरी दुसऱ्या दिवशी त्यांनी केस केली. त्यांच्यावर बॅक फायर होणार हे माहित असताना ती केस केली जाते, असे राजकारण देवेंद्र फडणवीस करतात. सत्तेचा वापर करून भाजप पोलिसांकरवी विरोधकांवर गुन्हे दाखल करत आहे. पोलीस बांधवांनो आज त्यांची सत्ता आहे. त्यामुळे तुम्ही त्यांचं ऐकत आहात. उद्या आमचीही सत्ता येईल आणि तुम्ही आमचंही 100 टक्के ऐकून घ्याल, असं सुषमा अंधारे
म्हणाल्या. नाशिकच्या शेतकऱ्याने रस्त्यावर कोथिंबीर फुकट वाटली. या संदर्भात अंधारे म्हणाल्या की, भंगाराचा भाव 30 ते 40 किलो आहे. रद्दीचा भाव 20 रुपये किलो आहे. पण शेतकऱ्यांच्या कांद्याचा भाव किती आहे? शेतकऱ्यांनी काल एकर एकर कांद्याची होळी केली, तरी सरकारला घाम फुटत नाही, असा उद्विग्न सवाल यावेळी अंधारे यांनी केला.
भाजप नेत्यांना बाजूला करतंय...
भाजपने पंकजा मुंडे यांनाच नाही तर अनेकांना वापरून घेतलं. तसेच 2014 मध्ये वंजारी बेल्टमध्ये पंकजा मुंडे यांना फिरवलं. त्यांना आता बाजूला केलं. विनोद तावडे जरा हुशार ठरले. तावडे देवेंद्र भाऊंच्या तावडीतून सुटले आहेत. तावडे आता केंद्रात आपल स्थान निर्माण करू पाहत आहे. बावनकुळे यांना आता बोललेच पाहिजे. त्यांची अशी अवस्था म्हणजे अवघड जागेच दुखणं झालं आहे. त्यांना आता बोलता पण येईना आणि दाखवता पण येईना अशी अवस्था झाली आहे. केंद्रीय राजकारणाचा विचार केला तर लालकृष्ण आडवाणी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य भाजपसाठी खर्च केलं. त्या आडवाणींना बाजूला केलं. सुषमा स्वराज्य यांच्या शेवटचा काळ मोदी शहा यांनी
वेदनादायी केला. तोच कित्ता देवेंद्र फडणवीस गिरवत आहेत.
शेतकरी संघटनेचे राजू शेट्टींना वापरून घेतलं. नंतर त्यांची संघटना फोडली. सदाभाऊ खोत यांना तात्पुरत राज्यमंत्री पद दिलं. नंतर सोडून दिलं. आता सदाभाऊंना आम्ही विचारलं सदाभाऊ कुठं आहात? तर ते म्हणत आहेत, म्हशीच्या धारा काढतोय. तीच परिस्थिती महादेव जानकर यांची केली. महादेव जानकर यांना वापरून घेतलं. धनगर मत पदरात पाडून घेतली आणि त्यांना बाजूला केलं. तसच ते आता बच्चू कडू यांच्याबद्दल करत आहेत. राणा दाम्पत्याला हाताशी धरून ते बच्चू कडू यांचा गेम करू पाहत आहेत.
मुख्यमंत्र्यांना कॉप्या पुरवल्या जातात...
मुख्यमंत्री एमपीएससी आयोग म्हणण्याऐवजी निवडणूक आयोग म्हणतात. ते जेंव्हा पत्रकार परिषद घेतात, तेंव्हा त्यांना जाणीवपूर्वक कॉप्या पुरवल्या जातात, जणू काही आमचे एकनाथ भाऊ ढ आहेत, तर कधी कुणी त्यांचा माईक काढून घेतात. हे म्हणजे असं दाखवण्याचा प्रयत्न आहे की, मुख्यमंत्री सक्षम नाही. एकूणच मराठा मुख्यमंत्री सक्षम नाही हेच दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा आरोप अंधारे यांनी केला.
Tags :
105306
10





