पाथर्डी- अहमदनगर मार्च अखेर महामार्ग खड्डे मुक्त होणार- खा. सुजय विखे
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
मागील सहा वर्षांपासून रखडलेल्या कल्याण निर्मळ महामार्ग क्रमांक ६१च्या कामाला गती आली आहे. हा महामार्ग मार्चअखेर खड्डे मुक्त होणार असल्याची ग्वाही खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली.जिल्ह्यातील महामार्गांवरील खड्डे बुजविण्यासाठी पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी उपोषण केले होते.
त्यानंतर कल्याण-निर्मळ महामार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. आज (रविवारी) खासदार डॉ. विखे पाटील यांनी मराठवाडी, करंजी, देवराई, निंबोडी या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, करंजीचे सरपंच बाळासाहेब अकोलकर, मिर्झा मण्यार, सुनील साखरे, अभियंता दिलीप तारडे, स्मिता पाटील, ठेकेदार बी. के. देशमुख व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार डॉ. विखे म्हणाले की, या रस्त्याचे काम जुन्या डीपीआर नुसारच होणार आहे. त्यामध्ये बदल होणार नाही. जे आठ कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत, ते खराब रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी आहेत. हा महामार्ग मार्च अखेरपर्यंत खड्डे मुक्त होणार आहे. साईडपट्ट्या, रंगकाम, पथदिवे लावणे आदी कामे त्यानंतरही सुरूच राहतील. या महामार्गास विलंब झाला आहे, हे मान्य आहे. पण केलेल्या कामाचे श्रेय मी कधीही घेत नाही. विकासकामांच्या बाबतीत महाविकास आघाडी सरकारमुळेच अडचण येत होती. आता तिही दूर झाली असून, पाथर्डी-शेवगावमध्ये मोठ्या प्रमाणात निधी दिला असल्याचे विखे यांनी यावेळी सांगितले.
आपण फ्रंटफूटवरच
आमदार नीलेश लंके यांच्या आंदोलनांमुळे आपण बॅकफूटवर गेला आहात का, असे यावेळी डॉ. विखे यांना विचारले असता, 'मी बॅकफूटवर नाही, तर फ्रंटफूटवर खेळणारा माणूस आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांत दाखवून देऊ की बॅकफूटवर कोण व फ्रंटफूटवर कोण आहे, असे ते म्हणाले.