17-Feb-2025
अपारंपारिक ऊर्जाच देशाला जागतिक महासत्तेचा दर्जा देऊ शकते- डाॅ. शेषराव पवार
श्री आनंद महाविद्यालयात एक दिवशीय कार्यशाळा
पाथर्डी प्रतिनिधी:
पारंपारिक ऊर्जेचे स्त्रोत संपणार असून ते मोठया प्रमाणात प्रदूषण करतात. सौर ऊर्जा हा कधीही न संपणारा ऊर्जा स्त्रोत आहे. तसेच प्रदूषण न करणारा देखील आहे. विशेष असे की ती ऊर्जा मिळवण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत, असे प्रतिपादन डॉक्टर शेषराव पवार यांनी एकदिवसीय कार्यशाळेमध्ये केले. श्री आनंद महाविद्यालय पाथर्डी मध्ये भौतिकशास्त्र विभाग व विद्यार्थी विकास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवशीय जिल्हास्तरीय कार्यशाळा" अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत ,पाथवेज आणि टेक्नॉलॉजी"या विषयावर आयोजित केली होती.
अध्यक्षीय भाषणात डॉ. पवार यांनी सांगितले की,दिवसातील १२ तास सौर ऊर्जा आपल्या बरोबरच असते. उरलेल्या १२ तासांसाठी आपण सौर ऊर्जेची साठवण करून रात्रीच्या वेळी ती उपयोगात आणू शकतो. यासाठी खर्च सुद्धा अल्पप्रमाणात येतो. विद्युत ऊर्जा अतिशय महत्त्वाची असते. म्हणून बदलत्या काळानुसार आपण जास्तीत जास्त प्रमाणत सौर ऊर्जेचा वापर केला पाहिजे.
सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर करण्यास शिकले पाहिजे. याचा उपयोग आपल्याला घरगुती वीज, शेतकऱ्यांसाठी लागणारी वीज, कारखान्यांसाठी लागणारी वीज निर्मिती करण्यासाठी करता येऊ शकतो.
सौर सेल किंवा फोटोव्होल्टेइक सेल हे एक विद्युतीय उपकरण आहे, जे प्रकाशीय उर्जेचे थेट वीजेत रूपांतर करते. यासाठी फोटोव्होल्टेइक प्रभावाचा वापर केला जातो.
या कार्यशाळेमध्ये डॉ.शंकर केकडे, राधाबाई काळे महिला महाविद्यालय अहिल्यानगर,यांनी "ग्रीन एनर्जी" या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सोलर थर्मल पावर चा वापर करून समुद्रातील पिण्यायोग्य पाणी कसे तयार करता येते याविषयी माहिती दिली व अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत वापर वाढला पाहिजे असे प्रतिपादन केले. तसेच भविष्यात घरोघरी आपल्याला रुफ टॉप सोलर पॅनल वापर करून घरगुती वापरासाठी विद्युत निर्मिती करावी लागेल, ही काळाची गरज बनली आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्लॅस्टिकचा वापर नाकारला पाहिजे तरच पर्यावरण पूरक गोष्टींचा जास्तीत जास्त उपयोग करायला पाहिजे असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सुचविले. खराब पाणी पुन्हा चांगल्या वापरासाठीचे व्यवस्थापन आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट कश्या प्रकारे लावायला पाहिजे आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठीचे मार्गदर्शन त्यांनी केले.
या कार्यशाळेतील दुसरे व्याख्यान डॉ. रविकिरण लाटे अहमदनगर कॉलेज, अहिल्यानगर यांनी "सोलर फोटोहोल्टाईक पावर जनरेशन” या विषयावर दिले. सौर ऊर्जेचा वापर करून विद्युत निर्मिती कशी करता येते याविषयी माहिती दिली. तसेच आपल्याला घरगुती वापरासाठी विद्युत निर्मिती करावयाची असेल तर कसा सोलर प्लांट उभारावा लागतो, किती पावर जनरेट करायची आहे, त्यानुसार आपल्याला बजेट तयार करावे लागते. शासन स्तरावर शेतकऱ्यांसाठी, घरगुती वीज वापरासाठी अनुदान ही उपलब्ध आहे याविषयी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर बि.एस्सी. भौतिकशास्त्र पदवी प्राप्त केल्यानंतर असणाऱ्या विविध शिक्षणक्षेत्र, नोकरी इत्यादी संधी विषयी विस्तृत पणे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.
या कार्यशाळेत तिसरे व्याख्यान प्रा.प्रणिता भावसार बाबूजी आव्हाड महाविद्यालय, पाथर्डी यांनी "इलेक्ट्रिक व्हेईकल आणि भविष्यात येणारे तंत्रज्ञान " या विषयावर दिले. नवीन तंत्रज्ञान विकसित करून भविष्यात गाडी रस्त्यांवर धावतील. अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत वापर केला तरच आपण ऊर्जेच्या कमतरते वर मात करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .या
कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. अजिंक्य भोर्डे यांनी केले तर सूत्रसंचालन शिवानी दहिफळे व कावेरी लोणारे यांनी केले. प्रा. सूर्यकांत काळोखे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक , सर्व विद्यार्थी उपस्थित होते.ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी डॉ. जगन्नाथ बरशिले, विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी व भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अनिता पावसे यांनी विशेष परिश्रम घेतले.