महाराष्ट्र
2126
10
या' कारणामुळे झाले तीन पोलीस निलंबित
By Admin
या' कारणामुळे झाले तीन पोलीस निलंबित
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणताना हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत भिंगार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख, सहायक फौजदार नैमुद्दीन शेख व पोलीस कर्मचारी पालवे यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. दरम्यान मयत सादिक लाडलेसाहब बिराजदार (वय 32 रा. मुकुंदनगर) हा वाहनातून पडून जखमी झाला असल्याचे शवविच्छेदनच्या प्राथमिक अहवालातून समोर आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
आरोपी सादिक विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने पोलीस कर्मचारी शेख आणि पालवे त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन येत हाेते. भिंगार नाला परिसरात सादिकला पाच जणांनी मारहाण केल्याची फिर्याद सादिकची पत्नी रुक्सार बिराजदारने दिलेली आहे. त्यानुसार पाच जणांविरोधात खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल आहे. मात्र, आरोपी सादिकला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना त्याने चालू वाहनातून उडी मारल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल झाले होते. त्यानुसार या दोन्ही प्रकरणांची व घटनेची चौकशी करण्याचे आदेश अधीक्षक पाटील यांनी शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांना दिले होते.
या चौकशीचा अहवाल ढुमे यांनी पाटील यांच्याकडे सादर केला आहे. पोलिसांकडून आरोपी पकडण्याच्या संदर्भात योग्य कार्यवाही झालेली नाही. जेवढी काळजी घ्यायला पाहिजे होती, तेवढी घेतलेली नाही, असे प्राथमिक अहवालावरून दिसून येत असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. मयत सादिक बिराजदार याच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख यांच्याकडे होता. तसेच बिराजदार याला ताब्यात घेण्यासाठी सहायक फौजदार शेख व कर्मचारी पालवे हे गेले होते. यांची याप्रकरणी चौकशी करण्यात आली असून यामध्ये तिघे दोषी आढळले असल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
दरम्यान, सादिक याचे शवविच्छेदन पुणे येथे झाले. याचा प्राथमिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून डोक्याला व शरीराला जखमा झाल्याचे यात म्हटले आहे. सविस्तर माहिती अद्याप आलेली नाही. मात्र फॉरेन्सिक विभागाकडून आलेल्या अहवालामध्ये सदरची घटना ही अपघात असल्याचे दिसून येत आहे, असे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
Tags :

