शेवगाव-माय लेकराच्या मृत्यू प्रकरणी एकजण ताब्यात
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील ठाकुर पिंपळगाव येथे दोन दिवसांपूर्वी नदीच्या पाण्यात मृतावस्थेत सापडलेल्या माय - लेकराच्या मृत्यू प्रकरणी मयत महिलेच्या पतीस बिडकीन (ता. पैठण) येथून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मयत महिलेची आई चंद्रकला नवनाथ जगदाळे यांच्या तक्रारीवरून अंबादास अशोक सोनवणे (वय-४०) व सुवर्णा अशोक घोरपडे (वय३५, दोघे रा. ठाकुर पिंपळगाव ता. शेवगाव ) या दोघांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
शेवगाव - गेवराई रस्त्यावरील भागीरथी नदीच्या पुलाखालील सिमेंटच्या पाईपमध्ये ज्योती अंबादास सोनवणे व दिपक अंबादास सोनवणे या दोघा मायलेकरांचे मृतदेह ९ ऑगस्ट रोजी सापडले होते. मायलेकरांच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली होती. या दोघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत तर्तवितर्क केले जात होते. मात्र मयत महिलेची मुलगी प्रियंका सोनवणे हिने दिलेल्या माहितीवरुन ज्योती व दिपक सोनवणे हे मायलेकरं पती अंबादास सोनवणे व सुवर्णा अशोक घोरपडे या महिलेसह रविवारी दुपारच्या वेळी घरामधून बाहेर गेले होते. सायंकाळी अंबादास सोनवणे हे एकटेच घरी आले. ज्योती व दिपक घरी आले नाहीत. त्यांचा शोधाशोध केला असता ते सापडले नाहीत. त्यानंतर पत्नी व मुलगा हरवला असल्याची खबर बोधेगाव पोलिस चौकीत दिली. दरम्यान, रविवारी झालेल्या पावसामुळे भागीरथी नदीस आलेल्या पाण्यात त्यांचे मृतदेह सोमवारी सकाळी आढळून आले. या मयत महिलेचा पती रविवारपासून गायब असल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता. आता अंबादास सोनवणे यास पोलिसांनी बिडकीन येथून ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास पावरा करीत आहे.