शेवगाव- नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील व्यवस्थापकाची आत्महत्या
नगर सिटीझन रिपोर्ट live टिम प्रतिनिधी
नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील व्यवस्थापक गोरक्षनाथ सूर्यभान शिंदे (वय ५८, रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. आज मंगळवारी दुपारी ३ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी, शिंदे हे दुपारी त्यांच्या भातकुडगाव येथील शेतात गेले हाेते. बराच वेळ झाला, तरी ते परतले नाही म्हणून नातेवाईकांनी शेताकडे गेले. त्यावेळी ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तत्काळ शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी शिंदे यांचा चुलत भाऊ कचरू शिंदे यांनी याबाबत शेवगाव पोलिसांना माहिती दिली. पाेलिसांनी या माहितीवरून आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील सोनेतारण अपहाराचा मुद्दा सध्या जाेरदार गाजत आहे. कर्जदारांनी बँकेत गहाण ठेवलेले सोने संशयास्पद असून त्याची चाैकशी करण्याची मागणी हाेत आहे. गोरक्षनााथ शिंदे यांनी २०१८ मध्ये तसे बँकेचे संचालक व वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र दिले होते. या पत्रावर मात्र काहीच कार्यवाही झाली नाही. याच तणावातून शिंदे यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे.