महाराष्ट्र
5953
10
LPG गॅस तुटवड्याचा महाराष्ट्रात पहिला मृत्यू! रांगेतच माजी सरपंचाने सोडले प्राण
By Admin
LPG गॅस तुटवड्याचा महाराष्ट्रात पहिला मृत्यू! रांगेतच माजी सरपंचाने सोडले प्राण
नगर सिटीन्युज live24 नेटवर्क-
गॅस सिलेंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे अकोला जिल्ह्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. गॅस टंचाईच्या टेन्शनमुळे अन्वी मिर्झापूर येथील वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळपासून गॅस मिळवण्यासाठी रांगेत उभे असताना त्यांना चक्कर आल्याने ते कोसळले आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर आणि नियोजनाच्या पूर्ण अभावावर संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शिरसाट यांना गॅस सिलेंडरसाठी ओटीपी मिळाला होता. मात्र ओटीपी मिळूनही त्यांना सिलेंडर देण्यात आला नाही, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शिरसाट यांच्या मृत्यूनंतर संताप व्यक्त करताना केला आहे. गॅस एजन्सीकडे वारंवार चकरा मारूनही सिलेंडर मिळत नसल्यामुळे ते सकाळपासून रांगेत उभे होते. दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले. उपस्थित नागरिकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाल्याचे सांगितले जात आहे.
तर ही व्यवस्था कोणासाठी?
शिरसाट यांच्या मृत्यूनंतर वंचित बहुजन आघाडीने राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. "ओटीपी मिळाल्यानंतरही नागरिकांना सिलेंडरसाठी तासन् तास रांगेत उभे राहावे लागत असेल तर ही व्यवस्था कोणासाठी आहे?" असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळेच हा मृत्यू झाल्याचा थेट आरोप करण्यात येत आहे. शिरसाट यांच्या निधनानंतर गावात शोककळा पसरली असून आज त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र या घटनेमुळे गॅस तुटवड्याचा प्रश्न किती गंभीर झाला आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.
प्रशासनाचे अपयश
नागरिकांना ओटीपी मिळूनही सिलेंडर मिळत नसल्याचा आरोप खरा असेल, तर ही केवळ निष्काळजीपणा नसून थेट प्रशासनाचे अपयश मानावे लागेल, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या घडलेल्या प्रकारासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी संताप व्यक्त केला आहे.
लग्न समारंभांनाही फटका
ग्रामीण भागातील लग्न सोहळ्यांनाही गॅस टंचाईचा फटका बसत असल्याचं दिसत आहे. उदाहणच घ्यायचं झालं तर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहराचं उदाहरण घेता येईल. खामगाव येथे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा फटका आता सर्वसामान्यांसोबतच लग्न समारंभांनाही बसू लागला आहे. शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या लग्न कार्यक्रमांमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत आहेत. 1500 ते 2000 पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था असलेल्या समारंभांमध्ये गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी, स्वयंपाक चुलीवर करावा लागत असून यामुळे वेळ, श्रम आणि खर्च या तिन्ही बाबींवर मोठा परिणाम होत आहे. गॅस टंचाईमुळे केवळ घरगुती वापरच नव्हे, तर मोठ्या कार्यक्रमांच्या नियोजनावरही परिणाम होत असल्याचे चित्र सध्या खामगावमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान, प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
Tags :
5953
10




