Nagar-ऑक्सिजनवरून जिल्हाधिकारी-डॉक्टरांमध्ये वाद
By Admin
Nagar- ऑक्सिजनवरून जिल्हाधिकारी-डॉक्टरांमध्ये वाद
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 21 एप्रिल 2021
अहमदनगर : जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांनीच आता त्यांच्या स्तरावर ऑक्सिजन जनरेशन प्लांटची उभारणी करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व खासगी रुग्णालयांच्या संचालकांना दिला. त्यामुळे शहरातील डॉक्टरांनी जिल्हाधिकाऱ्यांचा हा आदेश म्हणजे जबाबदारी झटकण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. याबाबत इंडियन मेडिकल असोसिशएन या डॉक्टरांच्या संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना उलट टपाली पत्र पाठवून ऑक्सिजन मिळाला नाही तर कोविडवरील उपचार थांबविण्याचा इशारा दिला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सर्व खासगी रुग्णालयांना मंगळवारी पत्र पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या आणि शासकीय रुग्णालयांची असलेली क्षमता यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे मेडिकल ऑक्सिजनची मागणी रोज वाढते आहे. सध्या ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत विचारणा होत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजन पुरवठादार यांच्याकडून विनाखंडित ऑक्सिजन पुरवठा होईल, याबाबत योग्य ते नियोजन करावे. सद्यस्थितीत वाढती कोरोना रुग्णसंख्या व संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. त्यामुळे सर्व खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर खरेदी करणे व ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट उभारणीबाबत त्वरित कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालयांना बजावले आहे.
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या या पत्रावर इंडियन मेडिकल असोसिएशनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे, सचिव डॉ. सचिन वहाडणे, माजी अध्यक्ष डॉ. निसार शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. यात म्हटले आहे की, कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, त्याप्रमाणात ऑक्सिजनची मागणी चौपट वाढली आहे. ऑक्सिजनचे वितरण अतिशय कमी प्रमाणात आहे. याबाबत वेळोवेळी प्रशासनाशी चर्चा केली आहे. सप्टेंबर-२०२० मध्येच हा मुद्दा उपस्थित झाला होता. सात महिन्यानंतर तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत रहावा, यासाठी प्रयत्न करणे प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र ही जबाबदारी प्रशासनाने झटकली आहे. उलट रुग्णालयांनाच ऑक्सिजन प्लांट उभारणी करण्यास सांगण्यात आले आहे. खासगी रुग्णालये ऑक्सिजन बाजारभावाने विकत घेण्यास तयार आहेत. मात्र योग्य प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. डॉक्टर्स डीलर्सकडून खरेदी करतात. परंतु त्यांनाच जर पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळाला नाही तर ते रुग्णालयांना कसे पुरविणार हा प्रश्न आहे. त्यामध्ये
जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राने आणखीनच संभ्रम तयार केला आहे. ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्यास पूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील. ऑक्सिजन पुरवठ्याबाबत अशाच अडचणी येत राहिल्या तर खासगी रुग्णालयांना कोविडवरील उपचार करणेच थांबवावे लागेल, अशा इशारच या पत्रात दिला आहे.