महाराष्ट्र
सर्वात मोठा महामार्ग भारतातील सर्वात मोठ्या बंदराशी जोडणार
By Admin
महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग भारतातील सर्वात मोठ्या बंदराशी जोडणार
इगतपुरीजवळ 85 किमी ग्रीनफील्ड एक्स्प्रेस वे
नाशिक - प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अशी ओळख असलेल्या समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा पूर्ण झाला आहे.
फेब्रुवारी महिन्यात या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण होण्याची शक्यता आहे. तब्बल 701 किलोमीटर लांबीचा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग भारतातील सर्वात मोठ्या बंदराशी जोडला जाणार आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग भारतातील सर्वाधिक लांबीचा द्रुतगती महामार्ग आहे.यापैकी नागपूर ते इगतपुरी असा 625 किलोमीटर लांबीचा महामार्ग सध्या कार्यान्वित आहे. तर इगतपुरी ते मुंबई हा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पाही आता पूर्ण झाला आहे. हा संपूर्ण महामार्ग सुरू झाल्यावर मुंबई ते नागपूर हे अंतर 16 तासांऐवजी अवघ्या 8 तासांमध्ये पार केलं जाणार आहे. विशेष म्हणजे या वेगवान प्रवासात सुरक्षेची खबरदारी घेत वाढत्या अपघाताच्या घटनांवर उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रातील वाढवण बंदर हा सरकारचा अत्यंत महत्वकांक्षी प्रकल्प आहे. समुद्रकिनाऱ्यावर 20 मीटरपेक्षा जास्त खोली असलेलं हे देशातील एकमेव नैसर्गिक बंदर आहे. त्यामुळे अजस्त्र कंटेनर येथे सहज येवू शकतात. जवळपास 298 मिलियन टन क्षमतेचं हे देशातील 13 व्या क्रमांकाचं बंदर असेल. वाढवण बंदर पूर्णपणे विकसित झालेल्यानंतर जगातील टॉप 10 कंटेनर पोर्ट देशांच्या यादीत भारताचा समावेश होणार.
देशातील या सर्वात मोठ्या बंदराशी राज्यातील अधिकाधिक जिल्हे जोडण्याच्या दृष्टीने राज्य सरकारचे नियोजन सुरूये. त्यानुसार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वाढवण बंदराला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबईनंतर नाशिक हे महाराष्ट्राचे तिसरे औद्योगिक केंद्र आहे.
मुंबई-नागपूर समृद्धी एक्स्प्रेस वेला इगतपुरी ते वाढवण डीप सी पोर्ट थेट जोडण्यासाठी नवीन 85 किमी प्रवेश नियंत्रित ग्रीनफील्ड एक्स्प्रेस वे बांधण्याची योजना MSRDC आखत आहे. या प्रकल्पाचा डीपीआर आता तयार झाला असून तो मंजुरीसाठी राज्य मंत्रिमंडळाकडे सादर केला जाणार आहे. हा रस्ता इगतपुरीजवळून सुरू होऊन NH48 हायवेवर चारोटीजवळ जोडला जाईल. यामुळे मुंबईची वाहतूक पूर्णपणे टाळून नागपूर ते वाढवण बंदरापर्यंत मालवाहतूक करणे अत्यंत सोपे होईल. या नवीन लिंक एक्स्प्रेस वेसाठी राज्य सरकारची मान्यता मिळाल्यावर भूसंपादन सुरू केले जाणार आहे. वाढवण बंदरासाठी गेल्या महिन्यातच अधिग्रहणाला सुरुवात झाली आहे
Tags :
48231
10