महाराष्ट्र
5875
10
भक्तीमय वातावरण राखण्यासाठी हनुमान टाकळीत डीजे बंदी कायम
By Admin
भक्तीमय वातावरण राखण्यासाठी हनुमान टाकळीत डीजे बंदी कायम
पाथर्डी-तालुका
धार्मिक परंपरांचे जतन आणि गावातील शांतता अबाधित राखण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी ग्रामपंचायत व ग्रामपरिवर्तन समितीने घेतलेला डीजे बंदीचा निर्णय पुन्हा एकदा ठामपणे अधोरेखित करण्यात आला आहे. "भक्तीमध्ये शिस्त आणि संस्कार हवेत, गोंगाट नव्हे," असा स्पष्ट संदेश देत ग्रामस्थांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या ग्रामसभेत सर्व ग्रामस्थांच्या एकमताने डीजे बंदीचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार ग्रामपंचायत हद्दीत कोणत्याही प्रकारच्या धार्मिक, सामाजिक किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये डीजे वाजवण्यास बंदी लागू करण्यात आली आहे. या निर्णयामागील उद्देश म्हणजे गावातील सामाजिक सलोखा, धार्मिक वातावरणाची पवित्रता आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हा आहे.
सध्या गावात श्री समर्थ महाबली हनुमान जन्मोत्सवानिमित्त सप्ताह सुरू असून, संपूर्ण गाव भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे. भजन, कीर्तन, हरिपाठ, पूजाविधी यांसारख्या पारंपरिक कार्यक्रमांमुळे वातावरण अधिक पवित्र आणि आध्यात्मिक झाले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपरिवर्तन समितीने ग्रामस्थ, युवक मंडळे आणि भाविक भक्तांना स्पष्ट शब्दांत आवाहन केले आहे की, या पवित्र उत्सवात डीजेसारख्या कर्णकर्कश साधनांचा वापर टाळावा.
समितीच्या मते, धार्मिक उत्सव हे संस्कृती, श्रद्धा आणि परंपरेचे जिवंत प्रतीक असतात. मात्र, डीजेमुळे होणारे ध्वनीप्रदूषण केवळ वातावरण बिघडवत नाही, तर वृद्ध, रुग्ण, महिला आणि लहान मुलांसाठी त्रासदायक ठरते. शिवाय देवस्थान परिसरातील पावित्र्यालाही यामुळे बाधा येते. त्यामुळे ग्रामसभेच्या निर्णयाचे काटेकोर पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असेही समितीने स्पष्ट केले आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कडक भूमिका घेतली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. मात्र, दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने सहकार्य करणे गरजेचे असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. "श्री हनुमान जन्मोत्सव हा केवळ उत्सव नाही,
तर श्रद्धा आणि संस्कारांचा उत्सव आहे. या उत्सवात शांतता, शिस्त आणि भक्तीचा आदर्श निर्माण करणे हीच खरी सेवा आहे," असे मत ग्रामपरिवर्तन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. युवकांनीही या उपक्रमात पुढाकार घेत आदर्श निर्माण करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले असून, "गावाच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय आदर्श ठरणारा आहे," असे मत व्यक्त केले आहे. पारंपरिक वाद्य, भजन-कीर्तन आणि धार्मिक विधींना प्राधान्य देत संस्कृती जपण्याचा संदेश यामुळे दिला जात आहे.हनुमान टाकळी ग्रामपंचायतीचा हा निर्णय केवळ नियम न राहता सामाजिक जाणीवेचे प्रतीक ठरत असून, इतर गावांसाठीही तो एक प्रेरणादायी आदर्श ठरणार आहे.
Tags :
5875
10




