अवघड गणित होणार सोपे! शिक्षण विभाग शाळांमध्ये राबविणार गणित सात्मीकरण प्रणाली
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
गणित विषय म्हटले की, विद्यार्थ्यांची बऱ्याचदा भंबेरी उडालेली दिसते. गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षण विभागाकडून प्रकाशित झालेल्या राष्ट्रीय सर्वेक्षण अहवालातून विद्यार्थ्यांमध्ये हा विषय इतर विषयांच्या तुलनेने अवघड आहे असे आढळून आले आहे.
विद्यार्थ्यांमधील गणिताची ही भीती कमी करण्यासाठी शिक्षण विभागाकडून गणित सात्मीकरण प्रणालीचा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडक शाळांमध्ये राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी शिक्षण विभागाकडून राबविण्यास ४ कोटींच्या निधीची मान्यता देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांची गणित विषयाबाबतची भीती कमी व्हावी व त्यांच्या आकलन पातळीत वाढ व्हावी यासाठी अध्यापन व अध्ययन पद्धतीत शैक्षणिक तंत्राचा वापर गरजेचा आहे. यासाठी प्रयत्न शिक्षण विभागाकडून सुरू असून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून (एससीसीईआरटी) गणित सात्मीकरण प्रणालीचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात आला.
दरम्यान, एससीईआरटीने ही प्रणाली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडक शाळांमध्ये पथदर्शी स्वरूपात राबविण्यास हरकत नसल्याचे अभिप्राय दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही निवडक मराठी माध्यमाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्रयोगिक तत्त्वावर या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्याची आणि त्याचे सनियंत्रण करण्याची जबाबदारी एससीईआरटीवर सोपवण्यात आली आहे.
सात्मीकरण प्रणाली म्हणजे नेमके काय?
गणिताची भीती दूर करण्यासाठी एससीईआरटी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी गणिताचे ई-साहित्य तयार करण्यात आले आहे. गणितात भौमितिक सिद्धांत, समीकरणे असतात. बीजगणितीय सूत्रे फळ्यावर विद्यार्थ्यांना समजावून शिकवावी लागतात. साहित्य, सूत्रांच्या एकत्रीकरणातून विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.