व्यवहारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करावा : डॉ. राजकुमार घुले
पाथर्डी न्यूज नेटवर्क-
दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करावा. पुस्तकांचे वाचन वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक घरात ग्रंथ असावा. घरात आई वडील जर पुस्तक वाचत असतील तर तीच सवय मुलांना लागत असते. वाचनामुळे भाषेचे सौंदर्य वाढते. जीवन समृद्ध होते. माणसे ओळखता येतात व लेखन करता येते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आपली प्रत्येकाची जबाबदारी आणखी वाढली आहे. असे प्रा. डॉ. राजकुमार घुले यांनी सांगितले.
कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, पाथर्डी आगार येथे मराठी भाषा गौरव दिनाची आयोजन केले होते. मराठी भाषेला खूप मोठी परंपरा आहे. शिलालेख, वर्गळी तसेच आद्यकवी मुकुंदराज यांच्या विवेकसिंधू पासून लीला चरित्रे, बखर वांङमय, अभंगगाथा , जातक कथा, काव्यरचना, नाटके , लोकगीते अशा विविध प्रकारात मराठी भाषेमधून लिखाण झालेले आहे. त्यामुळे मराठी भाषा समृद्ध झालेली दिसून येते. काळ जरी बदलला असला तरी मातृभाषेतून ज्याप्रमाणे भावना व्यक्त होतात त्या भावनांची बरोबरी इतर भाषेमधून व्यक्त करता येत नाही. मराठी भाषेत अनेक प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे. त्या साहित्याचे वाचन होणे गरजेचे आहे. सध्याच्या काळात वाचनाकडे दुर्लक्ष होतांना जरी वाटत असले तरी ग्रंथ प्रदर्शनांना वाढता प्रतिसाद पाहता भविष्यात वाचनासाठी नक्कीच चांगला काळ येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी नटसम्राट या नाटकातील स्वगते सादर करून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमास वाहतूक निरीक्षक गोवर्धन दहिफळे , हरिभाऊ फुंदे, रेवन्नाथ जाधव, वैशाली वायकर, छाया धायतडक, अनुराधा कवळीकर, रोहिणी गर्कळ, पठाण मॅडम, सुदाम गीते, नारायण कंठाळे, राजू गिरी, मुरलीधर डोईफोडे अनेक प्रवासी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानदेव काळे यांनी केले तर आभार गोवर्धन दहिफळे यांनी व्यक्त केले.