वृत्तपत्र विक्रेते हे जनसेवेचे कार्य प्रामाणिकपणे पार पाडतात- प्रा. मन्सूर शेख
पाथर्डी प्रतिनिधी :
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांच्या जन्मदिवसानिमि्त १५ ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. सोबतच हा दिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणूनही साजरा केला जातो.
डॉ. कलाम यांनी वयाच्या आठव्या वर्षापासून घरोघरी जाऊन वर्तमानपत्रा चे वाटप केले होते. याची माहिती त्यांच्या आत्मचरित्र "अग्निपंख"मध्ये सांगितली आहे.
याच अनुषंगाने विद्या कॉलनी येथे राहणाऱ्या बाबुजी आव्हाड कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. मन्सूर शेख यांनी या परिसरात पेपर विक्री करणाऱ्या विठ्ठल बोकेफोड यांचा शाल, श्रीफळ व पुस्तक देऊन सन्मान केला.
दररोज पहाटे उन, वारा,पाऊस, थंडी, आपत्ती, संप, बंद दिवस कसाही असो पेपर विक्रेते हे जनसेवेचे कार्य प्रामाणिकपणे पार पाडतात. कोणी सायकल, तर कोणी पायी चालत जाऊन वाचकापर्यंत वृत्तपत्र पोहचविण्यासाठी धडपड करत असतो.
त्यांच्या या कार्याचे कौतुक करणे, हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन प्रा. मन्सूर शेख यांनी केले. या सत्कारमुळे आमच्या कष्टमय जीवनाला नवीन उर्जा मिळाल्याची भावना विठ्ठल बोकेफोडे यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी सौ नफिसा शेख, अस्मा आणि आलिया शेख उपस्थित होत्या. पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ॲड. सुरेश आव्हाड, प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे व परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.